लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नसमारंभ वा कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने बॅन्ड पथकासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार बॅन्ड पथकामध्ये जास्तीतजास्त २० हून अधिक व्यक्तींचा समावेश नसावा. लग्नसमारंभात ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये बॅन्ड पथकातील सदस्यांची संख्या गृहित धरण्यात येईल. सामाजिक अंतर राखून बॅन्ड वाजविणे बंधनकारक असून, रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजविण्याची मुभा असल्याबाबतचे आदेश मनपा आयुक्त राधकृष्ण्न बी. यांनी जारी केले आहे.
बॅन्ड पथकाच्या मालकाने पथकातील सर्व सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग, सर्व साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. पथकातील सर्वांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. पथकातील एखाद्या व्यक्तीस ताप किंवा इतर कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याचा पथकात समावेश करू नये. कोविड-१९अंतर्गत शासन व मनपा आयुक्तांद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.