मालेगाव तालुक्यातील वादग्रस्त गाव : तहसीलदारांनी बैठक घ्यावीनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात जातीय भेदभाव अडथळा ठरत आहे. मालेगाव तालुक्यातील (जि. वाशीम) पांगरी नवघरे या गावातील हे प्रकरण आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे.रामदास वानखेडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पांगरी नवघरे गावातील लोकसंख्या ३८०० असून, यापैकी केवळ ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीतील आहे. या गावात बाबासाहेबांच्या जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच विरोध होतो. २००७ मध्ये यावरून मोठा वाद झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. तेव्हापासून गावात कोणत्याही धर्माच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. यंदा बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. यानिमित्त देशभर कार्यक्रम होत आहेत. गावात १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन हा अर्ज नामंजूर करण्यात आला. यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, मालेगाव तहसीलदारांना गावकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे व मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्याचे निर्देश दिले. या निर्देशाचे पालन करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
बाबासाहेबांच्या जयंतीसाठी हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2016 3:21 AM