नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार आहे. विशेष म्हणजे, या चारही (जाणाऱ्या दोन आणि येणाऱ्या दोन) गाड्यांना एक अतिरिक्त वातानुकुलित (थर्ड एसी) डबाही जोडण्यात येणार आहे.
मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई तसेच नागपूरहून मुंबई आणि मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेस काही महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या होत्या. या चारही गाड्या ३१ मार्च २०२४ पर्यतच धावणार, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या चारही गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे या गाड्यांना आणखी काही एसी कोच जोडून त्या कायमस्वरूपी चालविण्यात याव्या, असा प्रस्ताव रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यावर विचार विमर्श झाल्यानंतर या चारही गाड्यांना एका थर्ड एसीचा अतिरिक्त कोच जोडून त्याला ३१ मार्चनंतरही कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक २२२२२ हजरत निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकातून २ एप्रिल पासून चालवण्यात येईल.
त्याचप्रमाणे १२२८९ नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर १२२९० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ एप्रिल पासून चालविण्यात येणार आहे.