लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेवा ही संकल्प’ अशी गाठ बांधून कर्तव्यावर राहणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात चोरी गेलेल्या, गहाळ झालेल्या माैल्यवान चिजवस्तू परत करून रेल्वे प्रवाशांना सुखद धक्का दिला.
रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत चोरी झाली किंवा घाईगडबडीत कोणती माैल्यवान चिजवस्तू, रक्कम गहाळ झाली तर ती परत मिळणार नाही, असेच अनेकांना वाटते. त्यामुळे कित्येक प्रवासी छोट्या, मोठ्या रक्कम अथवा चिजवस्तूची तक्रार नोंदविण्याची तसदी घेत नाहीत. काही जण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना साधी माहितीही देत नाही. मात्र, ते चुकीचे आहे. रक्कम, वस्तूची किंमत कितीही असो, ती चोरी गेली किंवा गहाळ झाली तर त्याची माहिती रेल्वे पोलिस किंवा आरपीएफला दिल्यास ती परत मिळण्याची आशा असते. गेल्या वर्षभरात अर्थात २०२३ मध्ये १७८ प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रकारे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किमतीचे साहित्य ज्याचे त्याला परत केले. त्यात कुणाची पर्स, कुणाची बॅग, कुणाचा मोबाइल तर कुणाचा लॅपटॉप आदीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ज्यांनी तक्रार नोंदवली होती, त्यातील कित्येकांनी नंतर आपल्या सामानाचे काय झाले, त्याची साधी चाैकशीही कधी केली नव्हती. मात्र, आरपीएफने स्वत:च त्या व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या चिजवस्तू त्यांना परत केल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी दिली आहे.
तक्रार, माहिती देण्याचे आवाहन
ज्या कुणा प्रवाशाची चिजवस्तू चोरीला गेली किंवा गहाळ झाली अशांनी रेल्वे पोलिस किंवा आरपीएफकडे माहिती द्यावी. घटनेनंतर लगेच प्रत्यक्ष भेटून तक्रार अथवा माहिती देणे शक्य नसेल तर १३९ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी. त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांची चिजवस्तू परत मिळू शकते, अशी माहितीही आर्य यांनी दिली आहे.