कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला २३ वर्षे पूर्ण होत असली, तरी उपराजधानीत ‘घड्याळ’ विजयाचा गजर देऊ शकलेले नाही. काँग्रेसच्या मदतीने महापालिकेत सत्तेत वाटेकरी होऊन उपमहापौरपद मिळाले; पण स्वत: नगरसेवकांचा दोन अंकी आकडा गाठू शकली नाही. विधानसभेत स्वबळावर लढल्यावर नेत्यांनाही स्वत:च्या व पक्षाच्या ताकदीचा खरा अंदाज आला. बहुतांश नेत्यांचे डिपॉझिट जप्त झाले. नेत्यांची भरमार तरीही का मिळत नाही जनाधार, या प्रश्नावर पक्षाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
नागपुरात राष्ट्रवादीला तगड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मात्र, सामान्य मतदारांचे समर्थन लाभलेच नाही. राष्ट्रवादीला महापालिकेत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीने नागपूर शहरात चांगला जोर धरला. २००७ मध्ये काँग्रेससोबत आघाडी नव्हती तरीही ९ जागा जिंकल्या. २०१२ मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करीत ३० जागा दिल्या. मात्र, काँग्रेसचा हात पकडूनही राष्ट्रवादीला धावता आले नाही. फक्त ६ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत ५० ते ६० हजार मतदारांचा प्रभाग होता. विस्तार मोठा व संघटन शक्तीचा अभाव यामुळे घड्याळ बंद पडण्याची वेळ आली. स्वबळावर ११० लढली. मात्र, २०१२ पेक्षाही वाईट निकाल लागला. राष्ट्रवादीच्या घड्याळात तीन काटेही उरले नाहीत. फक्त एकच जागा जिंकता आली.
विधानसभेत स्वबळावर ‘डिपॉझिट’ जप्त
- प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी वाटाघाटी करताना राष्ट्रवादीकडून नागपूर शहरात किमान दोन जागा सोडण्याची मागणी केली जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली व नेत्यांना तसेच पक्षाला जनमानसात असलेली आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली. पूर्व नागपुरात दुनेश्वर पेठे यांनी दहा हजार मतांचा टप्पा ओलांडल्याचा अपवाद सोडला तर एकाही उमेदवाराला सन्मानजनक मते मिळाली नाही. बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव मोठे, दर्शन खोटे असल्याची प्रचिती आली.
अध्यक्षांनीही साथ सोडली
- नागपुरात राष्ट्रवादीची धुरा ज्यांच्याकडे सोपविण्यात आली, त्यांनी पुढे पक्षाचीच साथ सोडल्याचा इतिहास आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, माजी आ. अशोक धवड, अजय पाटील यांनी अध्यक्षपद गेल्यानंतर राष्ट्रवादीचे घड्याळ सोडले. चालकच गेले तर गाडी कशी धावणार, याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला.
विधान परिषद देऊन फायदा किती ?
- राष्ट्रवादी काँग्रेसने गिरीश गांधी यांना अल्पकाळासाठी विधान परिषदेवर पाठविले. त्यानंतर आ. प्रकाश गजभिये यांनाही परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली. मात्र, या आमदारकीचा पक्षवाढीसाठी खरंच किती फायदा झाला, याचे ऑडिट पक्षनेतृत्वाने करण्याची गरज आहे.
पवार, पाटील, वळसे सक्रिय; पण सातत्य हवे
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची फळी नागपूरवर अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार, संपर्क प्रमुख गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नागपूर दौरे वाढले आहेत; पण नेत्यांच्या या दौऱ्यात सातत्य असावे व मागेपुढे करणाऱ्यांपेक्षा जनाधार असलेल्यांना हेरून त्यांनी ताकद द्यावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा व पक्षाची गरजही आहे.
मतदारसंघ -उमेदवार- प्राप्त मते
पूर्व नागपूर -दुनेश्वर पेठे - १२१६४
पश्चिम नागपूर - प्रगती पाटील - ४०३१
मध्य नागपूर- मो. कामील अंसारी - ४८१५
उत्तर नागपूर- विशाल खांडेकर - ७७६
दक्षिण नागपूर- दीनानाथ पडोळे - ४१९४
दक्षिण-पश्चिम - दिलीप पनकुले - १०५५