देखभाल नाही : धूळ, असामाजिक तत्त्वांचा वावर
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात धावणारे वाफेचे इंजिन (स्टीम लोको) नागपूर रेल्वेस्थानकाची शोभा वाढविण्यासाठी रेल्वेस्थानकावर लावण्यात आले. परंतु या स्टीम लोकोची दुरवस्था झाली आहे. या इंजिनच्या खाली असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
रेल्वेतून वाफेचे इंजिन हद्दपार झाले आहे. सध्या विजेवर धावणारे इंजिन सर्वत्र वापरण्यात येत आहे. त्यामुळे वाफेच्या शक्तीवर धावणारे ऐतिहासिक इंजिन प्रवाशांना पाहता यावे यासाठी तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एक चबुतरा तयार करून हे इंजिन त्यावर ठेवले. या इंजिनला मोठा समारंभ आयोजित करून बुलंद इंजिन असे नावही देण्यात आले. या इंजिनच्या सभोवताल स्टीलच्या साखळी लावण्यात आल्या होत्या. परंतु काही काळानंतर या इंजिनच्या सभोवताली असलेल्या साखळ्याही चोरीला गेल्या. सध्या या इंजिनच्या खाली असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. तेथे मद्य प्राशन करून मद्यपी तेथेच दारूच्या बॉटल फेकतात. इंजिनच्या सफाईकडेही अलीकडच्या काळात लक्ष दिले जात नाही. मध्यंतरी या इंजिनमधून वाफेच्या इंजिनचा आवाज येण्याची व्यवस्था केली होती. प्रवासी कुतुहलाने हे वाफेचे इंजिन पाहायचे. परंतु हा आवाजही अलीकडच्या काळात बंद झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ऐतिहासिक इंजिनच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.