लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्त्वाची असते; परंतु रामटेक तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून, रहदारीला अडसर ठरत आहेत. काेट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्त्यांवर जागाेजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याने पायी चालणेही कठीण हाेत असल्याने गावकऱ्यांमध्ये असंताेष धूमसत आहे.
घाेटी टाेक- पंचाळा (बु.)- महादुला या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निधीतून २७ जुलै २०१९ राेजी सुरू करण्यात आले. तीन किमीचा हा रस्ता १८४.२१ लाख रुपयांच्या निधीतून १८ जानेवारी २०२१ ला पूर्ण झाला. मात्र, या रस्त्यावर अजूनही गिट्टी पडली नाही. या कामात निकृष्ट साहित्य वापरण्यात आले असल्याचा आराेप महादुला येथील नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावर अजूनही बांधकाम साहित्य पडले आहे. यामुळे रहदारीला अडसर ठरत आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी १५ लाखांची तरतूद केली असून, पाच वर्षे संबंधित कंत्राटदार देखभाल दुरुस्ती करणार आहेत; परंतु या रस्त्याची आताच इतकी दुरवस्था झाली आहे की, हा रस्ता नव्याने तयार करावा लागेल. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रामटेक ते हिवरा (भेंडे) हा रस्ता खड्डेमय झाला आहे. ‘लाेकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर रस्त्यातील काही खड्डे बुजविण्यात आले. मात्र, अजूनही या रस्त्याची समस्या सुटलेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता दाेन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. रामटेक- मुसेवाडी- हिवराबाजार या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली असून, जागाेजागी खड्डे पडले आहेत. या मार्गाने दुचाकी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. सदर रस्तासुद्धा काही वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट झाले असून, रस्त्यात ३-३ फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांची आहे.
रामटेक- काचूरवाही हा रस्तासुद्धा खड्डेमय झाला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत ‘लाेकमत’ने सतत पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित विभागाने रस्त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे; परंतु आता काेराेनामुळे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध हाेत नसल्याचे सांगितले जाते. रामटेक तालुका अविकसित आहे. मानव विकास निर्देशांक कमी आहे. रामटेक हे पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी सुंदर रामटेकसाठी निधी आणून, त्याचा उपयाेग याेग्य हाेताे की नाही, हे पाहणे गरजेचे झाले आहे.