लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शिकारपूर फाटा ते शिकारपूर गावापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. जागाेजागी खड्डे पडले असून, डांबरीकरण पूर्णत: उखडले असल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक विभाग दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यात संताप व्यक्त हाेत आहे.
शिकारपूर फाटा ते शिकारपूर गावापर्यंतच्या ३ किमी रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, डांबरीकरण उखडले आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात नित्याची बाब झाली आहे. तसेच या मार्गाने शिकारपूर, रत्नापूर, तराेली गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी वेलतूरला ये-जा करतात. परंतु रस्त्याच्या दैनावस्थेमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास साेसावा लागताे. हा रस्ता जागाेजागी उखडला असल्याने दुचाकी वाहने स्लिप हाेऊन अपघात घडतात. काही दिवसांपूर्वी रत्नापूर येथील एक तरुण अपघातात जखमी झाला. शिकारपूर रस्ता वेलतूर व पचखेडी मार्गाला जाेडणारा असून, या मार्गाने नाेकरदार, व्यावसायिक, शेतकरी व शेतमजुरांची सतत वर्दळ सुरू असते. परंतु या खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना गावकऱ्यांना नाहक त्रास साेसावा लागत आहे. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदाेलनाचा इशारा बाबा तितरमारे, रामू तलवारे, राजकुमार चाैधरी, राकेश कुथे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.