लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कुख्यात गुंडांच्या टोळीने कळमन्यात अनेकांचे भूखंड हडपण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे, पीडितांकडून तक्रारी करूनही कळमना पोलीस त्या गुंडांवर कारवाई करीत नसल्याने पीडितांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांजरा वस्ती आहे. या भागात १४ एकरमध्ये असलेल्या एका ले-आऊटमध्ये १८ हजार चाैरस फूट जागा सार्वजनिक वापरासाठी (पीयू लॅण्ड) सोडण्यात आली होती. रवी अण्णा आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी या जागेवर छोटे छोेटे प्लॉट टाकून ते विकून टाकले. काटकसर करून अनेक गरिबांनी, कष्टकऱ्यांनी ही जागा विकत घेतली. गुंडांनी लाखोंची रक्कम घेऊन काही जणांना थेट विक्रीपत्र तर काहींना कब्जापत्र करून दिले. मात्र, सार्वजनिक वापराच्या जागेची खरेदी-विक्री करता येत नसल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे संबंधित खरेदीदारांना लक्षात आल्यामुळे, त्यांनी गुंडांच्या टोळीकडे आपली रक्कम परत मागितली असता त्यांनी या भूखंडधारकांना धमकावणे, मारणे, शिवीगाळ करणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काही जणांचे भूखंडही हडपण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे.
विशेष म्हणजे, या गैरप्रकाराविरुद्ध अनेकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कळमना पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांनी त्या गुंडांशी संगनमत करून पीडितांना हुसकावून लावण्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांकडे तक्रार घेऊन येणाऱ्यांना न्याय तर मिळत नाही. त्या गुंडांना मात्र तक्रार घेऊन येणाऱ्याचे नाव मात्र माहिती पडते. त्यामुळे रवी अण्णा, बाबू नामक गुंडांच्या टोळीतील गुंड संबंधित व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करतात, शिव्या आणि धमक्या देतात. दरम्यान, पीडित नागरिकांचा आक्रोश कानावर गेल्यामुळे गुन्हे शाखेने या टोळीकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, रवी अण्णाला पोलिसांनी आज चाैकशीसाठी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर अण्णाची चाैकशी सुरू होती.
---
सफेलकर कनेक्शन
कळमन्यातील भूखंडधारकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांच्या या टोळीसोबत गँगस्टर रणजित सफेलकर टोळीचे कनेक्शन होते. गुन्हे शाखेतील एक पोलीस कर्मचारीही या टोळीच्या सलग संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.
---