लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री करून एका व्यक्तीचे ११ लाख रुपये हडपणाऱ्या आरोपी रमेश बबनराव ठाकरे विरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी रमेश ठाकरेने दोन वर्षांपूर्वी दोषांत दाैलतराव नितनवरे (वय ४०, रा. यशवंत नगर) यांना माैजा भामटीतील एक भूखंड दाखविला. त्याची बनावट कागदपत्रे दाखवून आरोपी ठाकरेने तो नितनवरे यांना २३ ऑगस्ट २०१९ ला विकला. त्यापोटी ११ लाख रुपये घेतले. दरम्यान, हा भूखंड ठाकरे याच्या मालकीचा नसून, बाबूराव चंपतराव कराडे यांनी तो १२ फेब्रुवारी २००२ ला जयश्री सहारे यांना विकला होता, हे उघड झाले. त्यामुळे नितनवरे यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशी करून शुक्रवारी याबाबत आरोपी ठाकरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
----