लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे आदिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील प्लॉट चौघांनी हडपले. तब्बल सात वर्षांनंतर या प्रकरणातील बनवाबनवी उघड झाली. त्यावरून शुक्रवारी वाठोडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद युसूफ, पटेल सादिक अली, सिराज अहमद अब्दुल बशीर आणि मुरलीधर निमजे अशी आरोपींची नावे आहेत.
राजकुमार नथुजी ताटे (वय ६२, रा. बाबुलबन, लकडगंज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिघोरीत आदिवासी समाज उन्नती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेआऊट आहे. येथे खसरा नंबर आठ एक आणि आठ दोन मधील प्लॉट नंबर ३८ आणि ३९ ची बनावट कागदपत्रे आरोपींनी तयार केली. त्याआधारे या दोन्ही प्लॉटवर आरोपींनी कब्जा केला. २९ डिसेंबर २०१२ ते २२ मे २०१४ दरम्यान आरोपींनी ही बनवाबनवी केली. ती लक्षात आल्यानंतर फिर्यादी ताटे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगून पोलिसांनी चौकशीच्या नावाने बराच वेळ घेतला. त्यानंतर आरोपींची बनवाबनवी स्पष्ट झाल्यामुळे वाठोडा पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात मोहम्मद युसूफ, पटेल सादिक अली, सिराज अहमद आणि मुरलीधर निमजे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---
एका आरोपीचा मृत्यू
यातील आरोपी निमजे याचा मृत्यू झाला असून उपरोक्त तिघांची पोलीस चौकशी करीत आहेत.
----