नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी २४ एप्रिलला रीवा - इतवारी (नागपूर) ट्रेनला हिरवी झेंडी दाखविली. मध्य प्रदेशातील अनेक प्रकल्पाचा पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी शुभारंभ केला. त्यात रीवा - ईतवारी एक्सप्रेसचाही समावेश आहे. यामुळे मध्य प्रदेशातील हजारो प्रवाशांना, खास करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी नागपुरात येण्याची सोय झाली आहे.
रिवा ईतवारी एक्सप्रेस ही छिंदवाडा मार्गे संचालित करण्याचा निर्णय झाल्याची यापूर्वी चर्चा होती. विशेष म्हणजे, नागपुरात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा असल्याने येथे विविध उपचार करून घेण्यासाठी मध्य प्रदेशातील सतना, कटनी, जबलपूर येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नागपुरात येतात. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात रेल्वेमार्गे नागपूरला जाण्याची सोय नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक खासगी वाहने भाड्याने करून नागपुरात येतात. अनेक जण ट्रॅव्हल्सचा पर्यायही निवडतात. मात्र, आता ही गाडी सुरू झाल्याने मध्य प्रदेशातील विविध गावांतून रीवा मार्गे नागपुरात येण्याची सोय नागरिकांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.
१० स्थानकांवर थांबणाररिवा ते नागपूरचे अंतर ही रेल्वेगाडी १५ तासांत पूर्ण करणार आहे. रिवा येथून ती सायंकाळी ५:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता ती नागपुरात येईल. ही रेल्वेगाडी रिवा ते नागपूर दरम्यान सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नैनपूर, शिवनी, चाैराई, छिंदवाडा, साैंसर, सावनेर मार्गे नागपुरातील ईतवारी अशा १० रेल्वेस्थानकावर थांबे घेईल. त्यामुळे त्या त्या भागातील नागरिकांना आणि खासकरून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रवास करणे सुविधाजनक झाले आहे.