नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील १२ रेल्वे स्थानकांच्या विकासकामांची कोनशिला ठेवली जाणार आहे. सोबतच दपूमच्या ६४ आरयूबी, आरओबीचे तर मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील ३६ आरयूबीचे (रोड अंडर ब्रीजचे) लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत.
देशाची लोकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या रेल्वेचे नेटवर्क अधिक प्रशस्त करून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतूने रेल्वे मंत्रालयाने एक व्यापक आराखडा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर, अमृत भारत स्टेशन ही योजना ऑगस्ट २०२३ पासून आकाराला आली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील वेगवेगळ्या प्रांतातील ५५४ रेल्वेस्थानकांवरील विकासकामांची कोनशिला सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ठेवली जाणार आहे. त्यात दपूम रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक, आमगाव, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, राजनांदगाव, डोंगरगड, बालाघाट, शिवनी, नैनपूर, मंडला फोर्ट, आणि छिंदवाडा या १२ रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे.
या सोबतच देशभरातील १५०० आरओबी (रोड ओव्हर ब्रीज) आणि अंडर ब्रीजचे उद्घाटन / लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यात दपूम रेल्वेच्या ६४ आरओबी आणि आरयूबीचा तसेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींचाही समावेश आहे. हे सर्व पूल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विविध शहर, गावानजीक आहेत. या संबंधाने रेल्वेची दपूम आणि मध्य रेल्वे हे दोन्ही विभाग कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.