नागपूर : ‘नागपूरमेट्रो-१’ प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी उद्घाटन केले जाणार आहे. हा आनंद ताजा असतानाच केंद्र सरकारने बुधवारी ‘नागपूर मेट्रो-२’ प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली. त्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.
नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यांतर्गत ४३.८ किलोमीटर लांबीची मेट्रो लाइन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत म्हणजे, २०२८ पर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील सर्व चारही लाइनला पुढे वाढविली जाईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ किमी), ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी), प्रजापतीनगरला कापसी (५.५ किमी) तर, लोकमान्यनगरला हिंगणा (६.७ किमी) शहराशी जोडले जाईल.
कन्हान लाइन कामठीतून जाणार आहे. कामठीतील अनेक नागरिक रोज नागपूरला जाणे-येणे करतात. त्यांना या लाइनचा लाभ मिळेल. कन्हानजवळ कोळसा खाणी आहेत. तेथील कर्मचाऱ्यांचीही या लाइनमुळे सुविधा होईल. याशिवाय बुटीबोरी येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा एमआयडीसी परिसर आहे. या एमआयडीसीमध्ये सुमारे ७५० उद्योग असून, तेथे सुमारे ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. नागपूर येथून हजारो कर्मचारी बुटीबोरीला जातात. त्यांना मेट्रो वापरता येईल. महामेट्रोने प्रकल्पाच्या टेंडरची तयारी सुरू केली आहे. टेंडर नोटीस लवकरच जारी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर करणार १० किमीचा प्रवास
२०४१ पर्यंत ७.७ लाख प्रवासी
दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रोज ५ लाख ५० हजार प्रवासी मेट्रोचा उपयोग करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही संख्या २०३१ पर्यंत ६ लाख ३० हजार तर २०४१ पर्यंत ७ लाख ७० हजारावर जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
..असे राहतील मेट्रो स्टेशन्स
- खापरी ते बुटीबोरी : १ - इको पार्क, २ - मेट्रो सिटी, ३ - अशोकवन, ४ - डोंगरगाव, ५ - मोहगाव, ६ - मेघदूत सीआयडीसीओ, ७ - बुटीबोरी पोलिस स्टेशन, ८ - म्हाडा कॉलनी, ९ - बुटीबोरी एमआयडीसी केईसी, १० - बुटीबोरी एमआयडीसी ईएसआर.
- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान : १ - पिली नदी, २ - खसारा फाटा, ३ - ऑल इंडिया रेडिओ, ४ - खेरी फाटा, ५ - लोकविहार, ६ - लेखानगर, ७ - कॅन्टोन्मेंट, ८ - कामठी पोलिस स्टेशन, ९ - कामठी नगर परिषद कार्यालय, १० - ड्रॅगन पॅलस टेम्पल, ११ - गोल्फ क्लब, १२ - कन्हान.
- प्रजापतीनगर ते कापसी : १ - पारडी, २ - घर संसारनगर, ३ - कापसी.
- लोकमान्यनगर ते हिंगणा : १ - माउंट व्हीव, २ - राजीवनगर, ३ - वानाडोंगरी, ४ - हिंगणा एपीएमसी, ५ - रायपूर, ६ - हिंगणा बस स्टेशन, ७ - हिंगणा तहसील कार्यालय.