लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी याने केलेला घोटाळा यूपीएच्या काळात २०११ मध्ये सुरू झाला, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केला.गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांचे काटोल येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सिन्हा यांनी शुक्रवारी भेट दिली. यानंतर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याचा समावेश डावोस येथील पंतप्रधानांच्या दौऱ्यात होता. नीरव मोदी याचा फोटो हा पंतप्रधानांनी उद्योजक, अधिकाऱ्यांसोबत काढलेले अधिकृत छायाचित्र आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात नीरव मोदीच्या झालेल्या समावेशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेला युक्तिवाद हास्यास्पद आहे, असे सांगत गुन्हा दाखल झाल्यावर नीरव देश सोडून कसा पळून गेला, असा सवालही त्यांनी केला.
आरोग्य विमा योजना फसवीकेंद्रीय अर्थसंकल्पातील अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. गेल्या अर्थसंकल्पात कृषी सिंचन व दुग्ध व्यवसायासाठी योजना जाहीर झाल्या होत्या. या योजनांची अंमलबजावणी झाली नाही. आरोग्य विमा योजनाही फसवी असून देशात ५० कोटी लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.