लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी बुधवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी मंदिर प्रशासनाने दिली.आचार, विचार आणि संस्काराने जनोजनी, मनोमनी श्रीरामाची मनोहारी प्रतिमा अंकित झाली आहे. त्यात प्रदीर्घ कालखंडानंतर श्रीरामजन्मभूमी अयोध्येत रामाचे मंदिर साकार होत आहे. त्याचे भूमिपूजन अयोध्येत होत असले तरी तो सोहळा देशातच नव्हे जगभरात साजरा होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीत देशातील सर्व देवालयांचे कपाट भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. नागपुरातील प्रख्यात पोद्दारेश्वर राममंदिरही बंदच होते. एवढेच नव्हे तर याच काळात २ एप्रिल रोजी श्रीरामजन्मोत्सवही कपाटबंदच साजरा करण्यात आला होता. त्यामुळे दर्शनासाठी लालायित असलेले अनेक भक्त मंदिराबाहेरच पाणावल्या डोळ्यांनी उभे असल्याचे दिसले होते. पोद्दारेश्वर राममंदिराची ५० वर्षांची परंपरा असलेली श्रीरामजन्मोत्सव शोभायात्राही स्थगित झाली होती. ती सल कायम राहणारच आहे. मात्र, गेले साडेचार महिने बंद असलेल्या या मंदिराचे कपाट एक दिवसाकरिता भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराचे बांधकाम निर्विघ्न पार पडो याकरिता सकाळपासूनच पूजन, अभिषेक सुरू झाले आणि दुपारी अयोध्येत पंतप्रधान भूमीपूजन करत असताना इकडे त्याचवेळी महाआरती पार पडली. प्रचंड मोठ्या कालखंडात नागपुरातील भक्तांना प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले नव्हते. ते दर्शन या घटनेने होत असल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अनेकांना ही बाब माहीत नसल्याने भक्तांची गर्दी नव्हतीच. त्यातही फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदी नेटाने पाळले जात होते. संध्याकाळी मंदिरात २१०० दिव्यांची आरास मांडून ‘रामदीपोत्सव’ साजरा करण्यात आला.
पोद्दारेश्वर राममंदिर : तब्बल साडेचार महिन्यानंतर भक्तांसाठी उघडले कपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 8:39 PM
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी बुधवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी मंदिर प्रशासनाने दिली.
ठळक मुद्देरुद्राभिषेक, महाआरतीने साजरा झाला रामजन्मभूमी पूजन सोहळा