- सुधीर रसाळ : डॉ. वि. भि. कोलते व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवनाचे मर्म कळायला लावते ती कविता ज्ञानाइतकीच मूलभूत असते. ज्ञानाच्या पातळीवर समांतर अनुभूती देत आणि ज्ञानप्राप्ती होत असल्याची जाणीव करवून देते ती कविता सर्वोत्तम असल्याची भावना डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वि. भि. कोलते व्याख्यानमालेत ते बोलत होते. आभासी यंत्रणेद्वारे पार पडलेल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. कुलगुरू यांनी वि. भि. कोलते यांच्या कार्याचे स्मरण केले. माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या पुढाकाराने डॉ. कोलते व्याख्यानमाला विद्यापीठात सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
चांगल्या कवितेबाबत कुठल्याही अभिरुचीसंपन्न वाचकाला सांगावं लागत नाही. मात्र एखाद्या कवितेला चांगली का म्हणावे, याचे निकष ठरवावे लागतात. समीक्षेचा प्रारंभ इथूनच होतो. भाषिक नवनिर्मितीची जी अनेक रूपं आहेत, त्यात काव्य, कथन आणि नाट्य ही मूलभूत रूपे निर्माण झाली आहे. कविता हे भाषेचे कलात्मक रूप आहे. ती कलात्मक अभिव्यक्तीचे साधन आणि साध्यही आहे. कवितेचे अनेक प्रकार दिसतात. पण, कवितेचे मूलभूत रूप मात्र भावकवितेतच दिसते. भावकवितेमध्ये मानवी भावना महत्वाच्या असतात. कवितेतील भाव शब्दात व्यक्त केला जातो. कवितेमध्ये शब्दाच्या वाच्यार्थातून एक अर्थ साकार होत असतानाच तो नाकारून आणखी अनेक अर्थ प्राप्त होतात. अनेक पातळ्यांवर कवितेमध्ये एक संघटना बांधली जाते. थोडक्यात चांगली कविता म्हणजे मूलभूत विचार, नाट्यात्मक रूप असलेली ती भावगर्भ अशी असते आणि ती वाचताना वाचकाला विचार आणि व्यक्तिमत्त्व संपन्न झाल्यासारखे जाणवत असल्याचे रसाळ यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर सुजित जाधव व हेमराज निखाडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.
...............