‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ : नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : उपराजधानीच्या साहित्य, कला, संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासात १४ जानेवारीच्या सायंकाळी आणखी एक स्वर्णिम अध्याय जोडला गेला. प्रसंग होता नागपुरातील सर्वाधिक खपाचे हिंदी दैनिक ‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापन दिनाचे. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित काव्यसंध्या ‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ मध्ये कविंनी हिंदी काव्याला एका नव्या उंचीपर्यंत नेऊन पोहचवले. तर उर्दू शायरने उर्दूचा गोडवा व सहजतेचे दर्शन घडविले. काव्यसंध्येत प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम तसेच प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, उर्दू शायरीत लयात्मकता साठी चर्चित असलेले भोपाळचे कवी मंजर भोपाली, व्यंग्य बाणांचे महारथी जयपूरचे संजय झाला व हिंदी काव्यात नव्या पिढीतील सशक्त हस्ताक्षर डॉ. विष्णु सक्सेना, तसेच हास्य विनोदाचे बाहशाह मानले जाणारे उज्जैनचे दिनेश ‘दिग्गज’ यांच्या रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शैलेश लोढा यांनी तर धमाल केली. सुमारे दीड तास त्यांनी श्रोत्यांना लोटपोट केले. उपस्थितांनी मनमुरादपणे त्यांच्या रचनांचा आनंद घेतला. त्यांच्या रचनांमध्ये व्यंग होते, गांभीर्य होते, हास्य, जीवनदर्शन, सामाजिक व राष्ट्रीय समस्यांचे चित्रण, समाजातील कुप्रथावर प्रहार, चेतना जागवणारी धार व जीवनाचे संपूर्ण मंथन होते. देशातील या दिग्गज रचनाकारांच्या श्रेष्ठत्वाचा अंदाज यावरूनच बांधता येतो की त्यांच्या प्रत्येक ओळीवर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. सभागृहाबाहेरलावलेल्या भव्य स्क्रीनवरही या कवींच्या रचना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या कवींच्या रचनांना श्रोत्यांना खूप हसविले, कुदवले व सोबतच गंभीर चिंतन करण्यासही भाग पाडले. कवींनी केली लोकमत समाचारची प्रशंसाकवींनी लोकमत समाचारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाची खूप प्रशंसा केली. कवी शैलेश लोढा म्हणाले, ज्या काळात एखाद्या कलाकाराला मिमिक्री करण्यासाठी शिक्षा होऊ शकते, त्या काळात विचारांना जिवंत ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. ज्या वृत्तपत्राचा मालक दुसऱ्या रांगेत व संपादक पहिल्या रांगेत बसतात त्या संस्थेची विचारधारा सहज लक्षात येते. (या कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा दुसऱ्या रांगेत बसले होते.) मुनव्वर राणा म्हणाले, पूर्वीच्या काळात माता आपल्या मुलांना मुशायऱ्यांमध्ये पाठवायची. कारण तेथे विना लिहिता वाचता शिक्षण मिळत होते. समाज शिक्षणाच्या उद्देशाने लोकमत समाचारने केलेले हे आयोजन प्रशंसनीय आहे. अन्य कवींनीदेखील आपल्या रचना ऐकवताना वारंवार लोकमत समाचारचीही प्रशंसा केली. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र प्रास्ताविक करताना म्हणाले, सद्यस्थितीत लोकमत समाचार नागपूर शहरातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र बनले आहे. व्यवस्थापनाने संपादकीय विभागाला दिलेले स्वातंत्र्य हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. लोकमत समाचारने जनतेच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी ‘लोकमत समाचार आप के द्वार’ व ‘लोकमत समाचार की चौपाल’ अशा मोहीम राबविल्या. सामाजिक कटिबद्धता ठेवल्याने हे वृत्तपत्र सामान्य नागरिकांशी जुळून राहिले. लोकांच्या प्रेमामुळेच ही उंची गाठता आली, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन कवींचे स्वागत करण्यात आले. कवी शैलेश लोढा यांचे स्वागत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांनी केले. मुनव्वर राणा यांचे स्वागत उपमहाव्यवस्थापक आशीष जैन यांनी, मंजर भोपाली यांचे स्वागत लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य यांनी, संजय झाला यांचे स्वागत डेप्युटी एडिटर किरण मोघे यांनी, डॉ. विष्णु सक्सेना यांचे स्वागत लोकमत समाचारचे सिटी चीफ कमल शर्मा यांनी व दिनेश दिग्गज यांचे स्वागत डेप्युटी न्यूज एडिटर नंदू पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाचे प्रारंभिक संचालन करताना लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांनी लोकमत समाचारला सर्वाधिक खपाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली. मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमात शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, सुधाकरराव देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री रणजीत देशमुख, लोकमत समूहाचे संचालक (आॅपरेशन) अशोक जैन, वित्त नियंत्रक मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष (आयटी) राम सावजी, सहायक उपाध्यक्ष (वित्त) संजय खरे, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन.के. नायक उपस्थित होते.
काव्यसंध्येने केले लोटपोट
By admin | Published: January 16, 2016 3:44 AM