नागपूर : ज्येष्ठ लाेककवी ‘गदर’ यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमावरून गुरुवारी नागपुरात गदर उठला. एका प्रख्यात प्रागतिक विचारी संस्थेने कविसंमेलनाचे आयोजन केले होते. जय्यत तयारी झाली होती. कविसंमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐनवेळी तिथे पोलिस आले आणि तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही, अशी आडकाठी घातली व कार्यक्रम बंद पाडला. परवानगी न घेतल्याचे कारण पाेलिसांनी समाेर केले असले तरी ‘गदर’च्या क्रांतिकारी विचारांची धास्ती तर पाेलिसांना नाही ना? असा प्रश्न यावेळी कवींनी उपस्थित केला.
प्रसिद्ध दाक्षिणात्य लाेककवी ‘गदर’ यांचे ६ ऑगस्ट रोजी निधन झाले. या विद्रोही कवी आणि लोकगायकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲण्ड लिटरेचर यांच्यावतीने नागपुरातील विदर्भ हिंदी मोरभवन, येथे गुरुवार २४ ऑगस्ट राेजी संध्याकाळी क्रांतदर्शी कविसंमेलनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित या कविसंमेलनात लोकनाथ यशवंत, प्रसेनजित ताकसांडे, का. रा. वालदेकर, उल्हास मनोहर, सुधीर भगत, उषाकिरण आत्राम, प्रभू राजगडकर, चंद्रकांत वानखडे, महेंद्र गायकवाड, किरण काशिनाथ, सुरेश वर्धे, प्रसेनजित गायकवाड, संजय गोडघाटे, पल्लवी जीवनतारे, मच्छिंद्र चोरमारे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी सहभागी हाेणार हाेते. कार्यक्रमाच्या प्रारंभाआधीच पाेलिस पाेहोचले अन् या कार्यक्रमाला परवानगी घेतली नाही असे कारण देत कविसंमेलन थांबविले. यामुळे कवींमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
कार्यक्रम बंदिस्तस्थळी हाेता. कार्यक्रमाचे आयोजक आणि सहभागी साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रातील मान्यवर होते आणि एका दिवंगत कवी व लाेककलावंताप्रति आदरांजली म्हणून कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. अशा कार्यक्रमाला पोलिसांच्या परवानगीची गरज असते, हे नव्याने समाेर येत आहे. संघटनेने लाेकशाही मार्गाचा अवलंब करून संविधानाच्या चाैकटीत राहून कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. मात्र, पाेलिसांची कारवाई ही सांस्कृतिक दडपशाही असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला हाेय. या दडपशाहीचा आम्ही निषेध करताे.
- डाॅ. मच्छिंद्र चाेरमारे, कवी.