नागपूर : काेराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पामुळे हाेणाऱ्या वायूप्रदूषणाची कल्पना बहुतेकांना आहे. मात्र, वीज केंद्रातील राखेमुळे जलप्रदूषणाची स्थिती त्याहून भयावह झालेली आहे. दाेन्ही प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व गावांमधील नागरिक पाण्याच्या रुपात विष पित आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी), नागपूर, मंथन अध्ययन केंद्र, पुणे आणि असर साेशल इम्पॅक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिकांच्या सहभागातून केलेल्या अभ्यासात हे वास्तव समाेर आले आहे. सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे, मंथनचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी यांनी या अभ्यासातील माहिती 'लाेकमत'ला दिली.
फ्लायॲशच्या नमुन्यांमध्ये पीएम-२.५ व पीएम-१० च्या कणांसह आर्सेनिक, कॅडमियम, क्राेमियम, लेड, मॅंगनीज, मर्क्युरी, काेबाल्ट आदी जड धातूंचे घटक माेठ्या प्रमाणात असतात. हेच विषारी घटक आसपासच्या परिसरातील भूपृष्ठावरील पाणी, भूजलाच्या नमुन्यातही आढळले. टीमने २५ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात माेठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षार व विरघळलेले घनतत्व आढळून आले. यापेक्षा गंभीर म्हणजे या सर्व नमुन्यात सर्वात धाेकादायक मानले जाणारे मर्क्युरी, आर्सेनिक, लिथियम, अल्युमिनियम, सेलेनियम, आयर्न, काॅपर, निकेल, झिंक, फ्लाेराईड, ॲन्टिमाॅनी, बाेराेन, माॅलिबडेनम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पाण्याच्या निकषाच्या १५ पट अधिक आढळून आले. यातील काही ठिकाणच्या नमुन्यात मर्क्युरी, आर्सेनिक व अल्युमिनियमचे प्रमाण माेठ्या प्रमाणात आहे.
कन्हान नदी काठावरील ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात अल्युमिनियम १०० पट अधिक हाेते. खैरी गावाजवळच्या नमुन्यात मर्क्युरी व फ्लाेराईडचे प्रमाण ५०पट अधिक आढळले. हे पाणी पिण्यासाठी, आंघाेळ, कपडे धुण्यासह इतर घरघुती उपयाेग, मासेमारी, सिंचन व गुरांसाठीही वापरले जाते. या गावातील नागरिक अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले असून, त्यांना गंभीर धाेक्यात जगावे लागत आहे.
१८ गावे राखेने बाधित
सर्वेक्षण केलेल्या २१ गावांपैकी १८ गावे दाेन्ही वीज केंद्रातून उत्सर्जन व धुरांड्याद्वारे निघणाऱ्या काेळशाच्या राखेने बाधित झाली आहेत. लाेकांच्या घराच्या छतावर, पाण्याचे साठे, माेकळ्या जागा व वाहनांवर दरराेज राख साचून राहते. ही राख पिकांवर साचून राहते. त्यामुळे पिकांची वाढ थांबते, उत्पन्नात घट हाेते तसेच जनावरे व दुग्ध उत्पादनांवर परिणाम हाेत आहे.
वाॅटर एटीएमचे पाणीही बाधित
शुद्ध पाणी मिळावे म्हणून प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये वाॅटर एटीएम लावण्यात आले. या एटीएमच्या पाण्यातही कमी प्रमाणात असले तरी विषारी घटक आढळल्याचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितले.
नागपूरला येणारे पाणीही प्रदूषित
कन्हान नदीवरूनच नागपूर शहराला पाणीपुरवठा हाेताे. मागील वेळी नदी पात्रात राख साचल्याने पाणीपुरवठा बाधित झाला हाेता. शहरातील पाण्याचे नमुने तपासले नसले तरी राखेतील विषारी घटकांचे प्रदूषण शहरात येणाऱ्या पाण्यातही असण्याची शक्यता धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
यंत्रणांना शिफारशी
- भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना महाजेनकाे, प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याची टीका लीना बुद्धे व श्रीपाद धर्माधिकारी यांनी केली.
- राखेवर नियंत्रणासाठी महानिर्मितीने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययाेजना तातडीने कार्यान्वित कराव्या.
- स्थानिक भूजल व वायु स्त्राेतांमध्ये राखेचा विसर्ग निश्चित कालमर्यादेत थांबवावा.
- प्रदूषण मंडळ तसेच पर्यावरण मंत्रालयाने कालबद्ध उपाययाेजनांवर निगराणी ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.
- दाेन्ही प्रकल्पातून निघणाऱ्या फ्लायअॅशचा १०० टक्के वापर करणे अत्यावश्यक आहे.
- नव्या प्रकल्पाची मंजुरी तातडीने थांबवावी. नांदगाव येथील प्रस्तावित नवे अॅश पाॅण्ड थांबवावे.