नरेश डोंगरे / कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाेहखनिज पिघळवून लोखंड तयार करणाऱ्या, त्यासाठी वातावरणात सतत आग ओकणाऱ्या वर्धेनजीकच्या भूगाव येथील लॉयडस् अर्थात उत्तम गलवा स्टील प्लांटमुळे भूगावसह आजूबाजूच्या गावातील जीव, जंगल, जल अन् जमीन अक्षरश: करपली आहे. या प्रदूषणाबद्दल सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत लोकमत चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत धक्कादायक वास्तव उजेडात आले असून, शेतकरी तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवावर उठलेल्या आणि सोबतच बेरोजगारांची कोंडी करणाऱ्या या कारखान्याची दादागिरी खपवून कशी घेतली जाते, असा कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
परिसरावर काळा थर
लोखंड तयार करणाऱ्या या कारखान्याच्या चिमण्या वरून विषारी धूर ओकतात तर कारखान्यातून निघालेले लोहमिश्रीत विषारी रसायन मागच्या भागातून खोदलेल्या नाल्यातून सोडले जाते. या लोटामुळे आजूबाजूची जमीन बंजर, नापीक बनली. जमिनीची उत्पादनक्षमता कमालीची घटली असून, इतर भागात एकरी ५ ते ७ क्विंटल कापूस होत असेल तर कारखान्याच्या नाल्यालगतच्या शेतात एकरी २ ते ३ क्विंटलच कापूस निघू लागला. या कापसाची प्रत (दर्जा) ही निकृष्टच. त्यामुळे बाजारात पाच ते सात हजार रुपये क्विंटल कापसाला भाव मिळत असताना या भागातील कापूस कुणी तीन हजारांत घ्यायला तयार नसल्याचे गाऱ्हाणे शेतकरी मांडतात. सोयाबीन, ज्वारी, गहू अन् हरभऱ्यासह तुरीचीही हीच व्यथा. कारण ही सर्वच उत्पादने काळेपण घेऊन बाहेर येतात. धुराच्या लोळांमुळे पिकांवर, पाना-फुलांवर काळ्या क्षाराचा थर चढलेला दिसतो. हा काळेपणा काढण्यासाठी पीक धुवून काढले जाऊ शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल विकून मिळेल ते पदरात पाडून घेतात.
साठे-घंगारेंनी पाहिलेले स्वप्न आणि आजची वाताहत
वर्धेतून सतत लोकसभेवर निवडून जाणारे दिवंगत काँग्रेस नेते वसंतराव साठे व त्यांचे प्रतिस्पर्धी रामचंद्र घंगारे यांच्या राजकीय जुगलबंदीतून लॉयडस् स्टील कारखाना उभा राहिला. वर्धेच्या विकासासाठी काय करता, बेरोजगारांच्या हाताला काम देणारा कोणता मोठा प्रकल्प आणला, असा प्रश्न कॉ. घंगारे हे साठेंना विचारायचे. ‘मी कारखाना आणीन अन् तुम्ही लेबर युनियन उभी करून तो बंद पाडाल’, असे साठे यांचे घंगारेंना प्रत्युत्तर असायचे. तेव्हा १९९२-९३च्या दरम्यान घंगारे यांनी साठे यांना जाहीर सभांमधून ‘तुम्ही कारखाना आणा, मी कामगार संघटना उभी करणार नाही’, असे वचन दिले. त्यातूनच त्यावेळी पोलाद मंत्री असलेल्या साठे यांनी वर्धेत लॉयडस् स्टील प्लांट आणला. हा कारखाना वर्धा जिल्ह्याच्या विकासाला चालना देईल, भरपूर रोजगार निर्माण होईल, सामान्यांच्या हातात पैसा खुळखुळेल, जीवनमान सुखकर होऊन बाजारपेठा फुलतील, असे स्वप्न होते. १९९५-९६च्या दरम्यान लॉयडसचे उत्पादन सुरू झाले. पाच-सात वर्षे ठिकठाक सुरू होते. नंतर कारखान्याला घरघर लागली. कारखाना डबघाईस येणे सुरू झाले. कामगारांचे प्रश्न, सुविधा, सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले. कारखान्याच्या आत आणि बाहेर संघर्ष वाढला. त्यामुळे दिवाळखोरीत ढकलला गेलेला कारखाना अखेर लॉयडस् प्रशासनाने उत्तम गलवा कंपनीकडे सोपवला.