तरुणाई बेभान : एन्ट्री हळुवार, पण वेग धोकादायक शफी पठाण नागपूर जगभरात टीकेचा धनी ठरलेल्या व स्मार्टफोवर खेळल्या जाणाऱ्या ‘पोकेमॉन गो’ने नागपूरकर तरुणाईलाही पार झपाटून टाकले आहे. शहरातील काही ठिकाणी पोकेमॉनची लोकेशन्स मिळू लागल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर नजर खिळवून वेगात चालणारे तरुण आता चौफेर दिसायला लागले आहेत. या गेमची नागपुरातील एन्ट्री हळुवार असली तरी ती व्हायरल होण्याचा वेग मात्र धोकादायक आहे. कारण, भान हरपून हा गेम खेळताना अप्रत्यक्षपणे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. आजची तरुणाई खूपच टेक्नोसॅव्ही आहे. कुठलेही नवीन तंत्रज्ञान आले की लगेच आत्मसात करते. परंतु असे करताना ते विधायक आहे की विध्वंसक याचा फारसा विचार केला जात नाही. ‘पोकेमॉन गो’ या गेमच्या बाबतीतही तसेच झाले आहे. या गेमच्या बाबतीत जगभरातून नकारात्मक बातम्या येत असताना आणि काही ठिकाणी लोकांनी प्राणही गमावले असताना तरुणाई काही यातून बोध घ्यायला तयार नाही. यातील काही जण तर केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून ‘पोकेमॉन’चा शोध घेत कुठेकुठे भटकत आहेत. कसा खेळतात हा गेम? व्हॅर्च्युअल आणि अॅक्चुअल याचे फ्युजन म्हणजे हा गेम आहे. आपल्या शहरातील एखाद्या चौकाचे लोकेशन्स घेतल्यानंतर तेथील रस्ते आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसायला लागतात. पोकेमॉन कुठे लपलाय याचे संकेत आपल्या मोबाईलवर मिळतात. यानंतर डोके मोबाईलमध्ये खुपसून जी दिशा दाखवली जाईल तिकडे स्लो स्पिडने ‘पोकेमॉन’चा शोध घेत फिरायचे. तो सापडला की लगेच दुसरा शोधायचा. अशी गेमची लेव्हल वाढत जाते. बरं...हे सर्व पोकेमॉन सापडले तर काही लॉटरी लागत नाही. उलट आपला बहुमूल्य वेळ आणि श्रम आपण उगाच खर्ची घातलेले असते.हा गेम लाईव्ह खेळला जात असल्याने जीपीएस सुरूच ठेवावे लागते. परिणामी इंटरनेट डाटा वेगाने खर्च होतो. आधी आपली आई-आजी सांगायची की, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपली माहिती द्यायची नाही. पण, आता आपण पोकेमॉन गो या खेळाद्वारे स्वत:चे लोकेशन व इतर माहितीही सर्रास शेअर करीत असतो. बरं...जो आपल्याला दिशा दाखवतोय तो कुठे बसलाय व तो आपल्याला नेमका कुठे नेईल, यातले काही माहिती नसताना आपण अगदी आंधळेपणाने चालायला लागतो. यातून एकाग्रता कमी होण्याचा धोका तर आहेच शिवाय आपल्या खासगी व देशाच्याही सुरक्षेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे अशा गेमपासून तरुणांनी सावध राहायला हवे. महेंद्र लिमये, सायबर एक्सपर्ट
‘पोकेमॉन गो’ने नागपूरकरांनाही ‘याड’ लावले!
By admin | Published: August 03, 2016 2:37 AM