नागपूर : सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांनंतर अखेर नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले व एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीतील १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. सक्करदरा व नंदनवन पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली.
गुरुवारी साडेबारा वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलीसांचे पथक गस्तीवर असताना बुधवार बाजारातील पाण्याच्या टाकीसमोर बिंझाणी कॉलेजच्या कपाऊंडच्या आता आरोपी बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता गोपाल उर्फ बाला प्रमोद पिंपळकर (२२, शितला माता मंदीर जवळ, जुना बिडीपेठ), सैय्यद बिलाल उर्फ पशारत मिर (२३, आजाद काॅलोनी, मोठा ताजबाग), गौरव उर्फ टकल्या रामकृष्ण बोरकर (३२, जुना बिडीपेठ), शैलेश उर्फ बाजा रामकृष्ण बोरकर (२५, शितला माता मंदीर जवळ, जुना बिडीपेठ) यांना ताब्यात घेतले. आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून पाच दुचाकी वाहने, तीन हत्तीमार चाकु, एक तलवार, लाकडी दांडा, दोरी, मिरची पावडर, चार मोबाईल असा १.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सागर उर्फ ददु पुजारी (२९, भांडेप्लाॅट, सेवादल नगर) हा अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक १२ मध्ये धाड टाकली असता कुख्यात गुन्हेगार राजू शेंडेच्या घराच्या बाजुच्या झोपडीमध्ये चेतन मनोज बरडे (२३, नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १४), सोनु उर्फ मोगली राजु पाठक (२८, जुना बगडगंज), वैभव संजय डोंगरे (१९, डायमंड नगर), शुभम श्रीधर डुमरे (२८,नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १२) हे दरोडा टाकण्याच्या तयारीत दिसून आले. त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, एक लोखंडी राॅड, लाकडी बेसबाॅल स्टीक, दोरी, मिरची पावडर, असा एकुण अंदाजे अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचे साथीदार निखिल उर्फ डब्बा वासनिक (२६, जयभिम चौक), रोहन उर्फ येडा रंगारी (२८, जुना बगडगंज) , करण उर्फ ब्यान्नव रामटेके (१९, पडोळे नगर) हे फरार झाले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.