लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या तीन वर्षात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी सायंकाळी धरमपेठ येथील कॉफी हाऊसजवळील मुख्यमंत्र्यांच्या खासगी घरासमोर ‘हिसाब दो जवाब दो’ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी आंदोलन होऊच द्यायचे नाही, असा पवित्रा घेत आंदोलनकर्ते एकत्र येण्यापूर्वीच युवक काँग्रेसच्या एकेक कार्यकर्त्यांना पकडून गाडीत बसवून ठाण्यात नेले. तरीही कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करीत कॉफी हाऊस चौकात रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन यशस्वी केले. केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, बँक दर, एटीएम वृद्धी दर, एसएनडीए, ओसीडब्ल्यू या सर्वांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके व महासचिव कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते चौकात एकत्र आले. पोलीस त्यांच्या मागावरच होते. आंदोलनात नगरसेवक कमलेश चौधरी, नगरसेविका नेहा राकेश निकोसे, नगरसेवक दिनेश यादव, अजित सिंग, अनिल राय, तनवीर विद्रोही, हेमंत कातुरे, सुमीत भालेकर, शाहबाज खान चिश्ती, धीरज पांडे, वसीम शेख, अखिलेश राजन, फैजान शेख, अलोक कोंडापूरवार, इंद्रजित गुप्ता, राजेंद्र ठाकरे, स्वप्नील बावनकर, सौरभ शेळके, आनंद तिवारी, कुणाल पुरी, युगल विदावत, रोहित खैरवार, स्वप्निल सातफळे सहभागी होते. गृह विभागाची दडपशाही आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन आयोजित केले होते. त्यासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती, असे असतानाही गृह विभागाने दडपशाही केली. असेच सुरू राहिले तर यापुढे आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी कोण मागणार? - बंटी शेळके नगरसेवक व अध्यक्ष, युवक काँग्रेस शहराध्यक्ष आंदोलनाला परवानगी नव्हती आंदोलनकर्त्यांनी केवळ निवेदन सादर केले. त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही. कुठे आंदोलन करणार, किती लोकं उपस्थित राहणार यावर काहीच चर्चा झाली नाही. आंदोलन करायचेच होते तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा उल्लेख करायलाच नको होता. या आंदोलनाला परवानगी नव्हती. - सत्यवीर बंडीवार ठाणेदार, सीताबर्डी पोलीस ठाणे
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पोलीस व आंदोलनकर्त्यांत राडा
By admin | Published: May 27, 2017 2:55 AM