लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी हुडकून काढले. विशेष म्हणजे, तो पळून गेल्यामुळे ज्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते, त्याच पोलीस उपनिरीक्षकांनी दोन दिवस सलग परिश्रम घेऊन अखेर आज त्याच्या मुसक्या आवळन्यात यश मिळवले.
उबेद रजा इकराम उल हक असे आरोपीचे नाव आहे. उबेद पाचपावलीतील अपोलो मेडिकल स्टोअर्सचा संचालक आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले यांनी सापळा रचून रविवारी २ मे रोजी उबेदला रंगेहात पकडले होते. तो पाचपावली पोलिसांच्या कस्टडीत होता. मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात गर्दी झाल्याचे पाहून उबेदने ठाण्यातून पळ काढला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी उपायुक्तांकडून चौकशी करून घेतली. आरोपी
पळून जाण्यास पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत गोडबोले यांना गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले. ज्या आरोपीला आपण सापळा रचून पकडले तोच आरोपी आपल्या दुर्लक्षितपणामुळे पळून गेल्याने नोकरीवर गदा आल्यामुळे गोडबोले गेल्या दोन दिवसापासून झोपलेच नाही. ते पोलिस ठाण्यात राहुनच आरोपी छडा लावण्यासाठी प्रयत्न करू लागले. अखेर शनिवारी दुपारी त्यांना क्लू मिळाला. त्याआधारे गोडबोले आपल्या सहकाऱ्यांसह यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उप्पलवाडीतील झुडपी भागात पोहोचले. तेथे दडून असलेल्या आरोपी उबेद रजा याच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.
कारवाईबद्दल विचार
ज्या चुकीमुळे गोडबोले यांना निलंबित करण्यात आले त्या आरोपीला पकडून गोडबोले यांनी ती चूक दुरुस्त केली. त्यामुळे त्यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.