नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सोमवारपासून ठिय्या आंदोलनाला बसलेले विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, राम नेवले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावत आंदोलनस्थळ असलेल्या शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिराला सील करण्यात आले. दुपारनंतर आंदोलक पुन्हा परतले व सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य द्या, कोरोना काळातील वीजबिलांपासून विदर्भातील जनतेला मुक्त करा आणि पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढ कमी करा या तीन मागण्यांसाठी सोमवारी ऑगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. सकाळी ९ वाजेपासून आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली होती. तितक्यात दंगा नियंत्रण पोलिस पथकाच्या व्हॅन आल्या आणि त्यांनी आंदोलनस्थळाला गराडा घातला. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप आंदोलनस्थळी होते. त्यांना पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले व तहसील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
दरम्यानच्या काळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडीप्रमुख मुकेश मासुरकर व इतर कार्यकर्तेही आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी विदर्भ चंडिका मंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले. मुकेश मासुरकर व इतर आंदोलनकर्त्यांना बळाचा वापर करून पोलिस व्हॅनमध्ये बसवून तहसील पोलिस स्टेशनला नेण्यात आले. नंतरही बरेच कार्यकर्ते आंदोलनस्थळी एकत्र येत गेले. आंदोलनकर्त्यांची ही गळचेपी खपवून घेतली जाणार नाही. स्वतंत्र विदर्भ राज्य मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार यावेळी केला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये सुनील वडस्कर, रेखा निमजे, सुनीता येरणे, प्रशांत जयकुमार, ऋषभ वानखेडे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, उषा लांबट, शैलेश धर्माधिकारी, सुदाम राठोड, राजेंद्र आगरकर, राज ठाकूर, वीणा भोयर, उषा लांबट, राजू बोरकर, विजय मौदेकर, संजय हिंगे, अशोक हांडे, राजेंद्रसिंग ठाकूर, मुन्नाजी दुर्गे, प्यारूभाई, घीसू पाटील, रवींद्रसिंग ठाकूर, सुनील साबळे, विष्णू पाटील, अशोक पाटील, गोविंदराव चिंतावार, मारोती गडपल्लीवार, रामराव ताडपल्लीवार यांच्यासह शेकडो विदर्भप्रेमींचा समावेश होता.