लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलीस शिपाई अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रशांत पुंडलिक धोटे (३२) रा. पोलिस क्वॉर्टर, अजनी असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तो नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. शनिवारी २० जुलै रोजी तो नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वार अर्थात संत्रामार्केट परिसरात कर्तव्यावर होता. दरम्यान सोनभद्र उद्गम, सोनमुंडा, अमरकंटक मध्य प्रदेश निवासी महंत सोमेश्वर गिरी ब्रम्हलीन बारकेश्वरी गिरी (५८) हे शनिवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर आले. रविवारी नागपुरात मानवाधिकार संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार होते. कर्तव्यावर असलेला पोलीस शिपाई प्रशांत याने महंतांची तपासणी केली. बॅगमध्ये गांजा असल्याचा त्याने संशय व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच पोलिसाने त्यांना मारहाण केली. यात महंताचा हात फॅक्चर झाला. त्यानंतर तो पोलीस शिपाई फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गोंडाणे करीत आहेत. अद्यापही प्रशांतचा काही ठावठिकाणा लागला नसून तो लवकरच पकडल्या जाईल, अशी शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महंताला मारहाण करणारा पोलीस शिपाई फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:02 PM