नागपूर : शहरातील विविध चौकांमध्ये वाहनचालकांकडून अक्षरश: पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांना यापुढे हा प्रकार महागात पडणार आहे. त्यांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम उघडण्याचे निश्चित केले असून वाहतूक सिग्नल्सवर पैसे मागितले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढले आहेत.
शहरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीयांनी उच्छाद घातला आहे. वाहतूक सिग्नल्सवर ते पैसे मागतात व वाहनचालकांनी ऐकले नाही तर अगदी अश्लील वर्तनदेखील केले जाते. याशिवाय लग्न, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, जन्म सोहळा किंवा मृत्यूप्रसंगीदेखील तृतीयपंथी गटाने पोहोचतात व पैशांची मागणी करतात. त्यांच्या या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. याबाबत अनेकांनी पोलिसांकडे दाद मागितली. मात्र ठोस कारवाई झाली नव्हती. यासंदर्भात अखेर निर्देश जारी झाले आहेत.
पैसे मागण्यासाठी एकटे किंवा गटाने फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या कार्यक्रमस्थळी निमंत्रणाशिवाय पोहोचल्यासदेखील कारवाई होईल. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.