राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे मत नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी काही दिवसांपूर्वी महिलांबाबत केलेल्या वक्तव्य योग्य नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवारी येथे सांगितले. महिलांच्या तक्रारीसंदर्भात पोलिसांनी संवेदनशील होण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून नागपूर येथे महानगरपालिकेच्या महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी त्या आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये दारुबंदीसंदर्भात महिलांचे आंदोलन सुरू असून यासंदर्भात राज्य महिला आयोगाची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, दारुबंदीसंदर्भात राज्य महिला आयोगाने एक समिती गठित केली आहे. एनजीओ व विद्यापीठातील महिला सेलची यासाठी मदत घेतली जात आहे. यासंदर्भात एक सविस्तर अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) रहाटकर यांनी घेतली पीडितेची भेट रामटेक मनसरजवळील कांद्री माईन्स येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला. यात आरोपीने मुलीला जखमी केले होते. यात तिची बोटं कापल्या गेली. गळ्यावर गंभीर जखम असल्याने मेयो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती अतिशय नाजुक आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवारी या पीडित मुलीची मेयो रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तिच्या कुटुंबीयांना सांत्वना देत आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अनंत रोकडेसुद्धा होते. तत्पूर्वी महाल येथे पत्रकारांशी बोलतांना रहाटकर यांनी या अल्पवीयन मुलीच्या प्रकरणासोबतच कामठी येथे एका मुलीने छेडखानीला कंटाळून केलेल्या आत्महत्या प्रकरणाला महिला आयोगाने गांभीर्याने घेतले असल्याचे सांगत, या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांचे ‘ते’ वक्तव्य योग्य नाही
By admin | Published: May 24, 2016 2:57 AM