लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्याच्या प्रकरणात गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच, त्यांना जामीन मंजूर केला. प्रकरणावर न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
प्रकरणातील इतर आरोपी सागर सुरेश खांडेकर (वाहन चालक), शरद काशीराव जवंजाळ व राजू किसन इंगळे यांनाही समान दिलासा देण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये अमरावती सत्र न्यायालयाने गेल्या १५ ऑक्टोबर रोजी ठाकूर व इतर आरोपींना तीन महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध ठाकूर व इतरांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यासोबतच त्यांनी अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. तो अर्ज उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता मंजूर केला. अपीलकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, ॲड. कुलदीप महल्ले व ॲड. अनिकेत निकम यांनी कामकाज पाहिले.
अशी आहे घटना
पोलीस तक्रारीनुसार, ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. ठाकूर व इतर आरोपी कारने चुनाभट्टीकडून गांधी चौकाकडे जात होते. तो ''''''''''''''''वन वे'''''''''''''''' असल्यामुळे वाहतूक विभागातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांनी ठाकूर यांची कार थांबवली. परिणामी, राग अनावर झाल्याने ठाकूर यांनी वाहनाच्या खाली उतरून रौराळे यांना थापड मारली. त्यानंतर इतर आरोपींनीही त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी ठाकूर व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.