आत्महत्येचा प्रयत्न : एक चढला गाडीवर, दुसरा गेला चाकासमोर
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर रविवारी दुपारी १.३० वाजता दोन मतिमंदांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाची तारांबळ उडाली. दोघांनाही समजावून ठाण्यात नेण्यात आले. ही घटना लोकमान्य ०२८११ टिळक टर्मिनस-हावडा या गाडीत घडली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक धर्मेद्र जोशी (२२) हा मतिमंद युवक आहे. त्याचे वडील धर्मेंद्र जोशी यांचे मुंजे चौकात चहाचे दुकान आहे. तो दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आला. त्याने प्लॅटफाॅर्म क्रमांक ६ वर उभ्या असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस या गाडीच्या बी-७ कोचखाली उडी घेऊन तो गाडीच्या चाकासमोर बसला. थोड्याच वेळात गाडी सुटणार असल्यामुळे इतर प्रवासी घाबरले. त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक सतीश ढाकणे यांना माहिती दिली. त्यांनी लोहमार्ग पोलिसांना याबाबत सूचना दिली. लोहमार्ग सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे, हवालदार विजय मरापे, सतीश खवसे यांनी प्लॅटफाॅर्म गाठून ओएचई केबल बंद करून गार्डला गाडी पुढे न काढण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला प्लॅटफाॅर्मवर काढले. संबंधित युवकाची आई आल्यानंतर त्याला आईच्या स्वाधीन करण्यात आले.
..............
आरपीएफनेही युवकाला वाचविले
दुसऱ्या घटनेत एलटीटी-हटिया या गाडीच्या स्लिपर क्लास कोचवर एक युवक चढला. त्याने ओएचई तारेला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा युवकही मतिमंद होता. रेल्वे सुरक्षा दलाने ओएचई तारेतील विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर उपनिरीक्षक बी. एस. बघेल आणि चमूने या युवकाचीही समजूत घालून त्यास कोचवरून खाली उतरविले. संबंधित युवकाने आपले नाव अंबेश्वर कुमार राजेंद्र सिंह (३०) रा. बासकी, पोस्ट तुरपा झारखंड असे सांगितले. त्याचे वडील आल्यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
..............