लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने शनिवारी सकाळी रेती तस्करांना जोरदार दणका दिला. ६ वाहनांसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली. या दणकेबाज कारवाईमुळे रेती तस्करांना पुन्हा एकदा हादरा बसला आहे. रेतीची चोरी तस्करी करून सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडविणारे रेती माफिया पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या रडारवर आहेत. त्यांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रेती तस्करांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, काही पोलिसांसोबत रेती माफियांचे मधूर संबंध असल्याने नागपुरात रेती तस्करी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांचे सहकारी अनेक दिवसांपासून रेती माफियांच्या तस्करीवर नजर ठेवून होते. शनिवारी सकाळी त्यांनी वाठोड्यात कारवाईची तयारी केली. खरबी ते चामट चाैक नॅशनल धाब्याजवळच्या परिसरात पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय विजय कसोधन, ओमप्रकाश सोनटक्के, एएसआय रमेश उमाठे, हवालदार राजकुमार शर्मा, बबन राऊत, नायक प्रशांत कोडापे, दीपक चोले, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, सतीश ठाकरे, शिपायी अविनाश ठाकरे, लीलाधर भांडारकर, नरेंद्र बांते दबा धरून बसले. रेतीने भरलेले तीन टिप्पर तसेच तीन बोलेरो वाहन दिसताच पोलिसांनी ते अडवले. चौकशीत या वाहनातून रेती तस्करी होत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ही वाहने, ५ मोबाईल असा एकूण ४८ लाख, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अशपाक शेख शेख ईसाक, मोहम्मद आरीफ मोहम्मद आदिल, नजिर शेख जरदार शेख, राजेश कारुदास शिंगाडे, निसार अनिल ठोंबरे, प्रशांत सखाराम वंजारी, अजिज खान मस्तान खान आणि अजिज शेख मुस्तफा शेख यांना ताब्यात घेतले. तर एमएच ०४ - एन ७६९९ चा चालक वाहन सोडून पळून गेला. त्याचा शोध घेतला जात आहे.