लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अनेक दशकांचा इतिहास असलेली आणि विदर्भातील सर्वात मोठी वेश्यांची वस्ती असलेली गंगाजमुना पोलिसांनी गुरुवारी सील केली. येथे यापुढे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर तसेच ग्राहक म्हणून वस्तीत फिरकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे एकीकडे काही जणांना आनंद झाला असतानाच दुसरीकडे तीव्र असंतोषही निर्माण झाला आहे.
अनेक वर्षांपासून गंगाजमुना वस्तीत वेश्याव्यवसाय सुरू आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत येथे महाराष्ट्रातील विविध शहरांसह, आंध्र प्रदेश, तेलांगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतरही अनेक प्रांतातील सुमारे तीन ते चार हजार वारांगना देहविक्रय करत होत्या. पोलिसांनी कडक धोरण राबविले अन् नंतर कोरोनाने या वस्तीत होत्याचे नव्हते केले. पोट भरायची सोय नसल्याने येथील अनेक वारांगना आपापल्या गावांकडे निघून गेल्या. ज्यांचे कुणीच नाही, अशा पाचशे ते सातशे वारांगना मात्र आजही त्या वस्तीत देहविक्रय करतात. त्यांना हुसकावून लावण्याचे अनेक प्रयत्न वेळोवेळी होत असतात. काही जण पडद्यामागून ही वस्ती खाली करण्यासाठी कामी लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, या भागात असलेले बीअर बार आणि दारूची दुकाने इतरत्र स्थलांतरित करण्यासंबंधानेही संबंधितांना सूचना देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासून या वस्तीला सील करून तेथील वेश्याव्यवसाय बंद पाडण्यासाठी मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. बॅरिकेडस् लावून तो मार्ग बंद करण्यासोबतच पोलिसांनी उद्घोषकाचा वापर करून या भागात बाहेरून येणाऱ्यांवर कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
---
नागरिकांचा विरोध अन् समर्थन
गंगाजमुनाच्या विरोधात असलेल्या परिसरातील मंडळींनी पोलिसांच्या या कारवाईला समर्थन दिले मात्र काही सामाजिक संघटना आणि नेत्यांनी कारवाईचा जोरदार विरोधही केला. शरीर विकून पोट भरणाऱ्या महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला नियंत्रित करावे, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्वाला धोटे म्हणाल्या. आम्रपाली संघटनेसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही या कारवाईचा जोरदार विरोध केला.
---
शेकडो कोटींची जमीन, कारवाईमागे कोण ?
गंगाजमुना बंद पाडण्याच्या कारवाईमागे कोण आहेत, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून वेळोवेळी उपस्थित केला जातो. शहरातील काही बिल्डरांची नजर या जमिनीवर असून, ते पडद्यामागे राहून ही शेकडो कोटींची जमीन बळकावण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असल्याचाही आरोपी होतो. आज पुन्हा तशीच चर्चा शहरात केली जात होती.
---