नागपूर - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर दरवाढ विरोध व कोरोना काळातील विज बिल माफी या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी उधळून लावले. आंदोलनस्थळी आलेले माजी आमदार ऍड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांच्यासह 35 जणांना अटक केली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेले हे ठिय्या आंदोलन 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत चालणार होते. काल दुपारी बारा वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच पर्यंत चालले. आज पुन्हा सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार होते. यासाठी कार्यकर्त्यांचे आगमन सुरू असतानाच तहसील पोलिसांचा ताफा शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरासमोर आंदोलनस्थळी पोहोचला. पोलिसांनी भराभर कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमध्ये कोंबले. आंदोलनस्थळी लावलेले बॅनर सुद्धा पोलिसांनी फाडून टाकले, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.
कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी स्वयंपाक करण्याची तयारी सुरू होती. पोलिसांनी सर्व अन्न आणि शेगड्या जप्त करून स्वयंपाक करणाऱ्यांना पिटाळून लावल्याची माहिती आहे. या आंदोलनाला परवानगी नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.