लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवून रेती तस्करी करणाऱ्या माफियांचा गड असलेल्या भंडाऱ्यात शहर पोलिसांनी मुसंडी मारली आहे. सोबतच रेती तस्करीत सहभागी असलेल्या चार टिप्पर चालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मुळावर घाव घालू पाहणाऱ्या या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा विषय असलेल्या रेती तस्करांवर पोलीस आयुक्तांनी २ नोव्हेंबरला नजर फिरविली. थेट गुन्हेशाखेचे पथक कारवाईसाठी कामी लावले. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेती तस्करीत गुंतलेल्या अन्नू जैन, पवन जैन, विनोद भोयर, धीरज ढोबळे, सुधाकर बड़वाईक, अनमोल चव्हाण आणि रमेश डोळस यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारी कटकारस्थानाच्या आरोपावरून अटक करून त्यांचा पीसीआर मिळवला. त्यांच्या पोलीस कोठडीचा एक दिवस शिल्लक असताना गुन्हेशाखेने आणखी चार जणांना अटक केली. दीपक गजानन जांभूळकर, कमलेश जागेश्वर वैद्य, अनिल चाचेरे आणि सतीश अशोक वाघमारे यांचा अटकेतील रेती तस्करात समावेश आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नेटवर्क चालविणारे अस्वस्थ
रेती माफियांचा गड समजला जाणाऱ्या भंडारा शहर आणि जिल्ह्यात शिरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. या संबंधाने पोलीस अभ्यासपूर्ण कारवाई करीत असल्याने खापा, खापरखेडा, कन्हान, कामठी, कोराडी, उमरेडमध्ये बसून रेती माफियांचे नेटवर्क संचालित करणाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.