लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारेगाव (ता. कामठी) शिवारात २२ मार्च २००७ च्या रात्री विशाल पैसाडे, रा. कामठी याचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा मृत्यू अपघातात झाल्याची नाेंद त्यावेळी पाेलिसांनी केली हाेती. मात्र, विशालचा मृत्यू अपघाती नसून, त्याचा खून करून अपघाताचा बनाव करण्यात आला हाेता, हे नुकतेच स्पष्ट झाल्याने खापरखेडा पाेलिसांनी तब्बल १४ वर्षे ९ महिन्यानंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
या खून प्रकरणात खापरखेडा पाेलिसांनी रणजित हलके सफेलकर (४७, रा. कामठी), विनय ऊर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथव (४२, रा. हंसापुरी, छोटी खदान, नागपूर), हेमंत लालबहादुर गोरखा (४८, रा. न्यू येरखेडा, ता. कामठी), राजू विठ्ठल भद्रे (५०, रा. भांडे प्लॉट, नागपूर), संजय ऊर्फ संजू विठ्ठल भद्रे (४८, रा. भांडे प्लॉट, नागपूर), गौरव बबन झाडे (३२, रा. सोमवारी क्वाॅर्टर, नागपूर) व तुषार दलाल यांच्यावर खुनाचा गुन्हा नाेंदविला आहे.
रणजित सफेलकरने २२ मार्च २००७ च्या रात्री कल्लू सफेलकरच्या माध्यमातून विशाल पैसाडे याला स्वत:च्या घरी बाेलावले हाेते. त्याने विनय बाथवच्या मदतीने राजू भद्रेची एमएच-३१/सीएम-६२९६ क्रमांकाची स्काॅर्पिओ भिलगाव येथे बाेलावली हाेती. साेबतच हेमंत गोरखा यालाही तेथे बोलावले हाेते. विशाल त्याच्या एमएच-३१/एई-८१६२ क्रमांकाच्या स्कूटरने रात्री ९ वाजताच्या सुमारास रणजित सफेलकरच्या सांगण्यावरून त्याच्या घरून रणजित सफेलकरसोबत बोरियापुरा कामठी भिलगावला गेला हाेता. तिथे सर्व जण दारू प्यायले. त्याच ठिकाणी विशालला जबर मारहाण करण्यात आली.
पुढे रणजित सफेलकर, हेमंत गोरखा, विनय बाथव या तिघांनी जखमी विशालला स्कॉर्पिओत बसवले व वारेगाव शिवारातील पुलाजवळ आणले. मोहम्मद आरिफ अन्सारी ऊर्फ आरीफ मुच्छड हा विशालची स्कूटर घेऊन रात्री १२.३० वाजताच्या सुमारास वारेगाव शिवारात पाेहाेचला. तिथे विशालला रोडवर झोपवून त्याच्या डोक्यावर स्कूटर ठेवली. रणजित सफेलकरच्या सांगण्यावरून विनय बाथवने स्कॉर्पिओ वेगाने चालवून स्कूटरला धडक देत विशालच्या अंगावरून नेली हाेती.
अनैतिक संबंधांचा संशय
विशाल पैसाडे हा रणजित सफेलकरचा भाऊ कल्लू सफेलकर याचा घनिष्ठ मित्र असल्याने त्याचे रणजित सफेलकरकडे नियमित येणे-जाणे होते. त्याचे आपल्या पत्नीसाेबत अनैतिक संबंध असल्याचा रणजित सफेलकरला संशय हाेता. त्यामुळे रणजित सफेलकर विशालवर नजर ठेवून हाेता. विशाल पैसाडे याची साथीदारांच्या मदतीने हत्या केली आणि त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला, अशी कबुली रणजित सफेलकरने पाेलिसांना दिली. बयाण नाेंदविण्यासाठी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली हाेती. त्यानंतर त्याची न्यायालयीन काेठडीअंतर्गत चंद्रपूर येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली.
पाेलिसांना दिले खाेटे बयाण
विनय या घटनेची संपूर्ण माहिती पाेलिसांना सांगेल, अशी रणजित सफेलकर, राजू भद्रे, संजय भद्रे व तुषार दलाल या आराेपींना भीती हाेती. सत्य लपवून स्वतःला वाचवण्यासाठी विनयऐवजी गौरव बबन झाडे याला खापरखेडा पोलिसांकडे पेश केले हाेते. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी विनय बाथव याने पाेलिसांना खोटे बयाण दिले हाेते.