लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिल्यामुळे संबंधित महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अवघे शहर पोलीस दल हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ज्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला ते सुटीवर गेल्याने संबंधितांमधील अस्वस्थता अधिकच तीव्र झाली आहे.एसीबीचे एसपी पी. आर. पाटील यांच्यावर त्यांच्याच कार्यालयातील महिला कर्मचा-याने लैंगिक शोषणाचा आरोप लावून नागपूरच नव्हे तर राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असताना आता वाडीतील पोलीस निरीक्षकावर महिलेने बलात्कार तसेच मारहाणीचा आरोप लावला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या महिलेचे वाडी पोलीस ठाण्यात नियमित येणे जाणे होते. त्यातून तिचे येथील पोलीस निरीक्षकासोबत मधूर संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांच्यातील संबंध एवढे जिव्हाळळ्याचे झाले की काही महिन्यांपासून हे दोघे एकाच रूमवर पतीपत्नीसारखे राहत होते. अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले कोल्हापूरकडे राहतात. ते तिला माहित होते. गेल्या काही दिवसांपासून महिलेने अधिका-यावर लग्नासाठी दबाव वाढवला होता. पत्नी आणि तीन मुले असताना लग्न करणे शक्य नसल्याचे त्याने तिला सांगताच ती आक्रमक झाली. तिने काही महिला नेत्यांच्या मदतीने वाडी पोलीस ठाण्यात या अधिका-याच्या विरुद्ध तक्रार देऊन त्याच्यावरील दबाव वाढवला. ती थेट कोल्हापूरलाही पोहचली. तेथे तिने अधिका-याचय पत्नीला भेटून हे प्रकरण तिच्याही कानावर घातले. मात्र, पत्नी किंवा पोलिसांकडून दाद मिळत नसल्याचे पाहून या महिलेने दोन महिला नेत्यांच्या मदतीने गुरुवारी पोलीस आयुक्तालय गाठले. त्या पोलीस निरीक्षकावर मारहाण करून लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तिने दिली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एसीपी शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले. शिंदे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, शुक्रवारी सुटीवर गेले. सोमवारी ते परत येणार असून, नंतरच या प्रकरणात काय करायचे, त्याचा निर्णय होणार आहे. या प्रकरणाच्या विरोधात काही महिलांनी उलट सूरही लावला आहे. कायद्याचा दुरूपयोग केला जात असल्याचे काही महिलांचे मत आहे.