उच्चशिक्षितांवर पोलिसांची नजर : भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजननागपूर : समाजाप्रति संवेदनशीलता जपणारे होतकरू आणि उच्चशिक्षित तरुण पोलीस दलात दाखल व्हावे, यासाठी पोलीस कल्याण विभागाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच जागृती कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे.राज्याची पोलीस यंत्रणा हायटेक व्हावी, पोलीस दल स्मार्ट व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न चालविले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नागपुरातील आगामी भरतीत उच्चशिक्षित तरुणांची भरती करण्यासाठी एक प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. पोलीस दलात उच्चशिक्षित उमेदवार भरती व्हावेत म्हणून त्यांना आतापासूनच भरतीपूर्व प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जागृती कार्यक्रम आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (प्रशासन) सुहास बावचे हे ही जबाबदारी पार पाडत असून, गुरुवारी त्यानिमित्ताने त्यांनी फॉरेन्सिक महाविद्यालयात कार्यशाळा घेतली. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस दलात चांगला पगार असून, अन्य कोणत्याही खात्यापेक्षा जास्त मान आहे, असे यावेळी उपायुक्त बावचे यांनी विद्यार्थ्यांसमोर सोदाहरण सांगितले. पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे आणि उपनिरीक्षक निखील निर्मळ यांनी यावेळी उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेष म्हणजे, प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांकडून कसल्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. पोलीस मुख्यालयात हे प्रशिक्षण वर्ग चालणार असून, त्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी, सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचा संपूर्ण खर्च पोलीस दल करणार आहे. पुढची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी ३० ते ४० दिवस शिल्लक आहे. इच्छूक उमेदवारांनी आपली नावे पोलीस आयुक्त कार्यालयात नोंदवावी. (प्रतिनिधी)पोलीस उच्चशिक्षित असेल तर तो कायद्याचे ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान लवकर आत्मसात करेल. परिणामी गुन्ह्यांचा शोध तातडीने लागेल आणि निकालही लवकर लागेल. त्याचमुळे उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस दलात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे.- डॉ. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त, नागपूर
पोलीस दल हायटेक बनविण्यावर भर
By admin | Published: February 20, 2017 2:02 AM