ठळक मुद्देटेक्नोसॅव्ही बंदोबस्तावर भर : स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममधून नियंत्रण१० उपायुक्तांसह ४०० अधिकारी : एसआरपीएफ अन् शीघ्र कृती दलही तैनात
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची शहर पोलीस दलाने तय्यारी पूर्ण केली आहे. शहर पोलीस दलाच्या मदतीसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून १० पोलीस उपायुक्तांसह सुमारे अडीच हजार पोलीस बंदोबस्ताला येणार आहेत. त्यातील ७० टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. रस्त्यारस्त्यावरील पोलिसांसोबतच सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूमचाही बंदोबस्तासाठी पोलीस वापर करून घेणार आहेत.राज्य निर्मितीच्या अनेक दशकानंतरचे नागपुरात होणारे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे. ४ जुलैपासून हे अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशनादरम्यान कसलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने येथे असलेल्या राज्य सरकारातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, बाहेरून येणारी मंडळी, अधिकारी तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधिमंडळावर धडकणारे मोर्चे, धरणे आणि आंदोलक या सर्वांच्या सुरक्षेसाठी १० पोलीस उपायुक्त, ३१ सहायक आयुक्त, ८७ पोलीस निरीक्षक, १० महिला पोलीस निरीक्षक, २९८ उपनिरीक्षक, ५९ महिला उपनिरीक्षक, २११९ पुरुष आणि ३२७ महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहर तसेच बाहेरचे सुमारे सहा हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यापैकी सोमवारी दुपारपर्यंत ७ पोलीस उपायुक्तांसह १७०० पोलीस अधिकारी-कर्मचारी नागपुरात दाखल झाले. त्यांना त्यांच्या नियुक्ती-जबाबदारीची माहिती आज देण्यात आली. सोबतच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही ठिकठिकाणी करण्यात आली आहे. काही वसतिगृहे आणि मंगलकार्यालयेही पोलिसांनी त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी घेतली आहेत.प्रत्येक घडामोडीवर लक्षअधिवेशनादरम्यान कमीत कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त चांगला बंदोबस्त करण्याचे शहर पोलिसांनी नियोजन केले आहे. त्यामुळे टेक्नोसॅव्ही बंदोबस्तावर पोलीस विशेष भर देणार आहेत. बंदोबस्ताच्या प्रत्येक घडामोडींचे नियंत्रण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कंट्रोल रूममधून केले जाईल. येथून शहरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यामातून कुठे काय घडले आणि कशाची आवश्यकता आहे, त्याची नोंद ठेवली जाणार असून, तसे दिशानिर्देश पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले जाईल.धमकी नाही, मात्र यंत्रणा सज्जपावसात अधिवेशन होत असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत मोर्चे कमी राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना मोर्चेकऱ्यांचे फारसे दडपण नाही. अधिवेशनाला कोणत्याही दहशतवादी अथवा नक्षलवाद्यांची धमकी नाही. मात्र, खबरदारीच्या आम्ही पूर्ण उपाययोजना केल्या आहेत, असे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बंदोबस्तासाठी शहर पोलिसांचे शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या सात कंपन्या आणि अग्निशमन दलासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही ताफा सज्ज आहे.