लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वत्र प्रचंड दहशत पसरली असताना आणि शासन-प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामी लागले असताना दोघांनी त्याची खिल्ली उडवणारा टिकटॉक बनविला. ते लक्षात येताच टिकटॉक बनविणाऱ्या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. वसीम रफिक खान (वय २७ ) आणि विक्की नरेंद्र रामटेके (वय २१) अशी या दोघांची नावे आहेत.खान आणि रामटेके हे दोघेही मोठा ताजबाग परिसरात राहतात. मनाई असताना ते आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास सीताबर्डीच्या मुख्य मार्गावर आले. येथे हे दोघे टिक टॉक व्हिडिओ बनवून कोरोना संबंधाने सुरू असलेल्या उपाययोजनांची खिल्ली उडवताना काहींना दिसले. त्यांनी सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलीस तेथे आले तेव्हा हे दोघे टिक टॉक बनवत होते. पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले आणि सीताबर्डी ठाण्यात नेले. बंदोबस्ताच्या संबंधाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची खिल्ली उडवणारे टिकटॉक त्यांच्या मोबाईलमध्ये होते. काहींना त्यांनी ते शेअरही केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मात्र हे दोघे चांगलेच हादरले. सोडून देण्यासाठी ते पोलिसांकडे गयावया करू लागले. पुन्हा असे न करण्याची हमी दिल्यानंतर त्यांना सायंकाळी पोलिसांनी मोकळे केले. मात्र, त्यांनी तयार केलेला टिकटॉक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कोरोना ईफेक्टलॉक डाऊन घोषित करूनही त्याला न जुमानता आपापली आस्थापना सुरूच ठेवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी दिवसभरात १९ केसेस केल्या. याअनुषंगाने कलम १८८ अन्वये १२ जणांना ताब्यात घेतले.