नागपूर : चौकात बसून महिला-तरुणींची छेडखानी करणे, दुकानदारांकडून खंडणी वसुली करणे अन् अगदी भरदिवसा दुकाने बंद करत त्यांना मारहाण करणे, अशी अगदी फिल्मीस्टाईल भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांमुळे हैराण झालेल्या पंचशीलनगरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अण्णा गँगविरोधात तक्रार देण्यासाठी दहशतीमुळे एकही नागरिक समोर येत नसताना पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांनी कारवाईसाठी पुढाकार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन त्यांची कैफियत ऐकल्यानंतर अखेर संबंधित गँगवर पोलिसांचा हंटर चालला आहे. या प्रकरणामुळे पोलीस अधिकाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असली तरी गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत मात्र नाराजीचा सूर कायम आहे.
गिट्टाखदानमधील पंचशीलनगर चौकात बसून काही सराईत गुन्हेगार दिवसाढवळ्या दहशत निर्माण करायचे. अगदी महिलांची छेड काढणे, लहान मुलांना शिवीगाळ करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू रहायचे. याशिवाय परिसरातील व्यापाऱ्यांना त्यांनी त्रस्त करून सोडले होते. त्यांची दहशत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास कुणीच धजावत नव्हते. १३ मे रोजी या गँगने चौकाजवळ धुमाकूळ घातला. रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांनी चौकातील काही दुकानदारांना मारहाण केली. तसेच दोन दुकानांचे जबरदस्तीने शटर बंद केले. शटर उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारांना मारहाण केली. मात्र तरीदेखील कुणीही तक्रार केली नाहीत. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त गुन्हे मुमक्का सुदर्शन व परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने यांच्या कानावर हा प्रकार गेला. अखेर हे दोघे अधिकारीच जनतेकडून कैफियत ऐकण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर महिला, दुकानदारांनी घडत असलेला नेमका प्रकार सांगितला, गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याचेदेखील यातून समोर आले. अधिकाऱ्यांच्या निर्देशांनंतर लगेच गँगमधील सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुधीर विल्सन, संदीप अण्णा, यश अण्णा, आशीष मॉरिस विल्सन, लक्की विजय यादव, मनिष उर्फ लक्की गुरू पिल्ले व मिथिलेश उर्फ बल्लू लक्ष्मीनारा यांचा समावेश होता. यातील संदीप, आशीष, मिथिलेश व मनिष यांना त्वरित अटक करण्यात आली.
‘सोशल मीडिया’वरील ‘व्हिडीयो’मुळे पोलखोल
या गँगमधील सदस्यांकडून अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिसांना याची माहितीदेखील होती, मात्र तक्रारच नसल्याने कारवाई होत नव्हती. १३ मे रोजी केलेल्या मारहाणीचे आरोपींचे व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाले. हे व्हिडीओ पोलीस उपायुक्तांकडे गेल्यानंतरच सर्व सूत्रे हलली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून प्रत्येकाविरोधात एक किंवा त्याहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.