लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सीताबर्डी येथील फ्रेंडस या कापडाच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये चित्रीकरण केल्या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मॉलसह इतर दुकानातील ट्रायल रुम तपासण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अचानक भेट देत मंगळवारी विविध मॉलसह दुकानातील ट्रायल रुमची तपासणी केली.मंगळवारी पोलिसांनी सीताबर्डीतील इंटरनिटी मॉल, बिग बाजार, ग्लोबल यासह इतरही लहान मोठ्या कापडाच्या दुकानातील ट्रायल रुमची तपासणी तसेच येथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यापुढेही आता वेळोवेळी पोलिसांकडून ट्रायल रुमची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मॉल व दुकान मालकांची पोलिसांकडून बैठकही घेण्यात येणार आहे. फ्रेंड्स या कापडाच्या दुकानाचे अनेक शाळेशी टायअप आहे. त्यामुळे येथूनच कपडे खरेदी करण्याचे बंधन पालकांवर आहे. येथे शाळेचा ड्रेस खरेदी करण्यासाठी विद्यार्थिनीची मोठी गर्दी असते. मालकाला पोलीस ठाण्यातूनच जामीनया प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दुकानाच्या मालकाला पोलीस ठाण्यातून अवघ्या दोन तासात जामीन देण्यात आला तर नोकरावर मात्र गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरील संशय वाढला आहे. केवळ नोकराला विनयभंगाचा आरोपी करून मालकावर केवळ नोकराची पडताळणी न केल्याचा गुन्हा दाखल करून दोन तासातच मध्यरात्री जामिनावर सोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.