लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाविरुद्धची लढाई धीरगंभीरपणे लढणाऱ्या नागपूर पोलिसांच्या खिलाडू वृत्तीचा गुरुवारी सकाळी पुन्हा एका घटनेतून प्रत्यय आला. आपल्या सहकाऱ्याचे कुटुंबीय बाहेरगावी असल्यामुळे आणि तो रात्रंदिवस बंदोबस्तात असल्यामुळे त्याचे मनोबल उंचावण्यासाठी इतर सहकारी पोलिसांनी त्याचा वाढदिवस चक्क रस्त्यावरच साजरा केला.सीताबर्डी पोलिस ठाण्यात गणेश भोयर हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत असल्यामुळे पोलिसांची जबाबदारीही जास्त वाढली आहे. त्यामुळे अनेकांना स्वत:च्या घरीदेखील जाता येत नाही. ही मंडळी मिळेल त्या ठिकाणी खाऊन आणि राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशाचपैकी पोलीस उपनिरीक्षक भोयर हेदेखील एक. भोयर यांचे कुटुंबीय गोंदियाला आहे तर ते नागपुरात एकटेच राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. बुधवारी त्यांचा वाढदिवस असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवली होती. आज सकाळी सीताबर्डी पोलिसांची बंदोबस्तासाठी झिरो माईल चौकात ड्यूटी लागली होती. पोलीस उपनिरीक्षक भोयर यांचीही तेथेच ड्यूटी होती. त्यामुळे भोयर यांच्या सहकाऱ्यांनी तेथेच ११ वाजताच्या सुमारास वाजता केक बोलविला. सर्व सहकारी तेथे पोहचले आणि त्यांनी चक्क रस्त्यावर केक कापून भोयर यांचा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे, या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणेदार जगवेंद्र राजपूत यांनी स्वराज्य फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तेथे बोलावून घेतले. स्वराज्यच्या एका पदाधिकाऱ्याने हॅपी बर्थडेची सुरेल धून व्हायोलिनवर वाजवली आणि त्याला पोलिसांनी टाळ्यांची साथ दिली. यानंतर भारावलेल्या पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी आपला आजचा वाढदिवस आजपर्यंत सर्वात चांगला वाढदिवस ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.