लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महिला होमगार्डला आपल्या कक्षात बोलवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणारे यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना आज निलंबित करण्यात आले. एवढेच नव्हे तर ज्या ठाण्यात ते गुरुवारपर्यंत ठाणेदार होते, त्याच यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
तक्रार करणारी महिला होमगार्ड २४ वर्षांची आहे. ती २ जूनपासून यशोधरानगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होती. ठाणेदार मेश्रामने तिची ड्युटी आपल्या कक्षासमोर (बेल ड्युटी) लावून घेतली. तिची काैटुंबिक स्थिती विचारून तिला ‘तुला पीएसआय’ बनवितो, असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचे प्रयत्न केले. तिला फोन आणि मेसेज करूनही सलगी साधली. ती फारसा प्रतिसाद देत नसल्याचे पाहून बुधवारी सायंकाळी मेश्रामने तिला आपल्या कक्षात बोलविले. तिला लाईन गार्ड (वर्दीच्या खांद्यावर असलेली दोरी)चे बटन लावून मागण्याच्या बहाण्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारामुळे महिला होमगार्ड रडू लागली. तेवढ्यात तिचा मावसभाऊ पोलीस ठाण्यात आला. त्याला पीडित महिलेने हा प्रकार सांगितला. त्याने हे प्रकरण पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे नेले. नीलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मेश्रामविरोधातील तक्रार सांगितली. आयुक्तांनी त्याची प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मेश्राम यांची गुरुवारी सकाळीच ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश दिले. दुसरीकडे या गंभीर प्रकरणाची चाैकशी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्याकडे सोपविली. साहू यांनी गुरुवारी दिवसभर पीडित महिला होमगार्ड, तसेच ठाण्यात अन्य काही महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चाैकशीत अनेक महिलांनी मेश्राम यांच्या तक्रारी केल्या. तसा अहवाल उपायुक्त साहू यांनी पोलीस आयुक्तांना दिला. त्यावरून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, मेश्रामविरुद्ध विनयभंग करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मेश्रामच्या निलंबनाचे आदेश काढले.
एक हजार रुपये दिले
विनयभंग केल्यानंतर होमगार्ड महिलेने विरोध केल्याने मेश्राम घाबरला. त्याने तिच्या हातात एक हजार रुपये कोंबून तिला गप्प राहण्यास बजावले. मात्र, पीडितेला तिच्या मैत्रिणींनी धीर दिल्याने या प्रकरणाचा बोभाटा झाला.
फिरायला जाण्याची इच्छा
मेश्रामचे यापूर्वीही महिलेच्या संबंधाने दोनदा बोंब झाली. दोन वर्षांपूर्वी लुटेरी दुल्हनशी सलगी असूनही काही मित्रांमुळे ते बचावले. यशोधरानगर ठाण्यात एकीला १० हजारांचे गिफ्ट देऊन फिरायला नेण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही प्रकरण या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे तो दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.