देशभरात समांतर नेटवर्क : डब्ब्यात कोण कोण ? नरेश डोंगरे नागपूरस्टॉक एक्स्चेंजसारखे देशभरात समांतर नेटवर्क असलेल्या आणि नागपुरातून आठवड्याला हजारो कोटींची सट्टेबाजी करणाऱ्या डब्बा व्यापाऱ्यांवर धाडी घालून शहर पोलिसांनी पहिल्यांदाच डब्बा व्यापाराचे झाकण उघड उघडले आहे. उघडलेल्या झाकणातून पोलीस काय काय बाहेर काढतात अन् कोण कोण पोलिसांना सापडतात, त्याकडे उपराजधानीतील बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. नागपुरात डब्ब्याची धूम आहे. येथील डब्बा व्यापाऱ्यांचे नेटवर्क देशभरातील डब्बा व्यापाराशी जुळले आहे. येथे शंभरपेक्षा जास्त डब्बा व्यापारी अन् दलाल असून, २ ते ३ हजार सट्टेबाजी करणारे आहेत. आठवड्याला दहा ते वीस कोटींचा खेळ करणारी मंडळी आहे. बहुतांश व्यापारी, उद्योजक अन् धनिक मंडळीच या गोरखधंद्यात गुंतली आहे. देशभरात डब्ब्याचे नेटवर्क चालवणारे ‘डब्बा किंग’ विविध चिजवस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ही सट्टेबाजी चालवत असतात. शासनाचे कर चुकवून समांतर ‘स्टॉक एक्स्चेंज‘ चालविले जाते. उदहारण द्यायचे म्हटल्यास एक जण व्यापारी किंवा दलालाच्या माध्यमातून १ हजार डाळीची पोती १ हजार रुपये भावाने खरेदी करेल. उपराजधानीतही डब्बा व्यवहार नागपूर : काही वेळेनंतर त्याच्याकडून दुसरा कुणी १ हजार ५० रुपये भावाने विकत घेईल. तिसरा व्यक्ती पुन्हा मनात येईल तेवढी रक्कम वाढवून डाळीची पोती खरेदी करेल. कुणीच खरेदी करण्यात स्वारस्य दाखवत नसेल तर डाळीच्या पोत्याची किंमत कमी होईल. अर्थात् ज्या काही जणांनी आधी खरेदी केली त्यांना तेवढ्या रक्कमेचा (एका पोत्यावर ५० रुपये, तर एक हजार पोत्यावर ५० हजार रुपये) लाभ मिळेल. ज्याच्याकडे माल डम्प झाला अन् भाव घसरला त्याला तेवढाच तोटा होईल. प्रत्यक्षात कुणी डाळ खरेदी करणार नाही, कुठे माल उतरवला जाणार नाही, कोणताच कर भरला जाणार नाही आणि हे सर्व न करताच कुणाला लाखोंचा फायदा होईल तर कुणाला लाखोंचा तोटा बसेल. डब्याच्या खेळात कुण्या ऐऱ्यागैऱ्याला स्थान नाही. एकप्रकारे व्यापारी अन् दलालांचा तो क्लब आहे. या क्लबमधील सदस्यच डब्याचा खेळ खेळतात. क्लबच्या वजनदार खेळाडूकडून ओळखी करून दिल्यानंतर डब्बा व्यापारी किंवा दलाल नवा ग्राहक जोडतो. प्रारंभी त्याच्याकडून अॅडव्हान्स घेतो. त्याची विश्वासार्हता पटल्यानंतर हळूहळू व्यवहारातील रोकड वाढते. आठवड्यातील एका दिवशी संपूर्ण आठवड्याचा हिशेब होतो. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरात शनिवारी हा व्यवहार पार पडतो. हारणाऱ्याकडून रोकड घेतली जाते. जिंकणाऱ्याला रोकड दिली जाते. डब्बा व्यापारी आणि दलाल एका आठवड्यात १५ ते ३० लाखांपर्यंतचे (व्यवहारानुसार) कमिशन मिळवितो. अनेक धनाड्य डब्याच्या खेळात रसातळाला जाऊन बर्बाद झाले आहेत तर व्यापारी अन् दलाल लबालब झाले आहेत. (प्रतिनिधी)हवालाशी चोली दामन डब्बा व्यापार आणि क्रिकेट सट्ट्यात कमालीचे साम्य आहे. कोणतीही लिखापढी या व्यवहारात होत नाही. कोणतीही आॅर्डर नोंदवली जात नाही. व्यापाऱ्याकडून केवळ एका रजिस्टरवर कच्ची नोंद केली जाते. मात्र, लाखो-करोडोंचा व्यवहार होतो. दलाल किंवा व्यापाऱ्याकडे संबंधित व्यक्तीचे रेकॉर्डिंग असते. त्यातूनच हार-जीतचा हिशेब केला जातो. लिखापढी नसली तरी कुणी उजर करू शकत नाही किंवा मी हे खेळलोच नाही, असे म्हणू शकत नाही. बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा व्यापार चालविला जातो. इंदूर आणि दिल्लीतील ‘कारागिरा’चे सॉफ्टवेअर विकत घेऊन बहुतांश डब्बा व्यापारी खेळ चालवितात. पैशाचा व्यवहार मात्र चोख असतो. त्यासाठी डब्बा व्यापाऱ्यांनी हवाला व्यावसायिकांना हाताशी ठेवले आहे. चोली-दामनसारखी डब्बा आणि हवालाची गाठ आहे. डब्बा व्यापारी हवालाच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणी संबंधितांची रोकड पोहचवतात. पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाईच्या माध्यमातून डब्बा व्यापाराचे झाकण उघडले आहे. डब्ब्याची कसून तपासणी केल्यास पोलिसांच्या हाती अल्लाउद्दीनचा दिवा लागू शकतो. त्यातून या धंद्याचे अंधारगाडगे उजेडात येऊ शकते. देशभरातील अनेक व्यापारीही डब्ब्यात सापडू शकतात.
पोलिसांनी उघडले डब्ब्याचे झाकण
By admin | Published: May 13, 2016 3:08 AM