लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरी केल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी राजू अभिमन्यू ईखारे याला निलंबित करण्यात आले. तो आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्यामुळे ते धंतोलीच्या कोठडीत आहेत.
आरोपी राजू ईखारे गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. धंतोलीमधील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरल्याची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गॅस सिलिंडर पोलीस कर्मचारी राजू ईखारे याच्या मदतीने आरोपी नंदू नथुजी रामटेके तसेच ज्ञानेश्वर बळीराम ईटणकर यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या तिघांना रविवारी धंतोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करून धंतोली पोलिसांनी त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पाठवला. त्यावरून ईखारेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.