नागपूर : होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका शांततेत आणि सुरळीत व्हाव्यात, यासाठी नागपूर पोलीसांनी शहरात पोलीस मार्च काढून कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत पोलीस मार्च काढण्यात आला.
त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून स्थानिक लोकांना पोलीस मार्च मागची भूमिका आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. परिसरात दारुड्यांचा उद्रेक, गुन्हेगारांकडून सामान्यांना धमक्या, तनिष्क नर्सिंग स्कूल, साईनाथ विद्यालयाजवळ उभे राहणारे युवकांचे टोळक्यांवर बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील प्रमोद वालमांडरे, मनोज गावंडे, अजय हिवरकर, शरद बांदे, विकास बुंदे, भूपेंद्र बोरकर आदींकडून करण्यात आली.