लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई, गोवाच नव्हे तर दुबई, बँकॉकसह विदेशातील अमली पदार्थाच्या तस्करांचा मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे.विशेष म्हणजे, आबूला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याच्या अमली पदार्थाच्या तस्करीत अनेक पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका वठवीत असल्याचे लोकमतने प्रकाशित केले होते. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी आबूच्या संपर्कात तब्बल १० पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे सांगून, लोकमतच्या वृत्तावर मोहोर उमटविली आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने ६ जानेवारीला आबूचा साथीदार जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५) आणि अरशद अहमद या दोघांना अटक करून त्यांच्याकडून पावणेदोन लाखांची एमडी पावडर जप्त केले होते. अत्यंत महागडे असे हे एमडी पावडर आबूच्या सांगण्यावरूनच स्मगलिंग करीत असल्याचे बच्चाने पोलिसांना सांगितले. त्यावरून १० जानेवारीला पोलिसांनी आबूच्या मुसक्या बांधल्या. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी सविस्तर चौकशी केली. सध्या आबू कारागृहात आहे.मात्र, त्याच्या चौकशीत त्याच्या संपर्कात शहरातील अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी असल्याचे उघड झाले. नुसता संपर्कच नव्हे तर आबूकडे तीन ते चार जणांची बैठकच होती, ते त्याच्याकडून फुकट एमडी घेत होते आणि त्याबदल्यात त्याला पोलिसांकडून कारवाई होणार नाही, याबाबत वेळोवेळी मदत करीत होते, असेही तपासात उघड झाले आहे. अशापैकी आबूकडे बैठक मांडणाऱ्या १० पोलिसांची नावे उघड झाली; त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट तयार करण्यात आल्याचेही उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितले.वरिष्ठ घेणार निर्णयअमली पदार्थ तस्करी करणाऱ्याच्या अड्ड्यावर बैठक जमविणाऱ्या पोलिसांची नावे आणि त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय वरिष्ठच घेणार असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उपरोक्त धक्कादायक बाब उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितली आणि त्याचवेळी डिफॉल्ट रिपोर्ट असणाºया एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेत संलग्न करण्यात आल्याचेही वृत्त व्हायरल झाले. त्यामुळे वरिष्ठांनी त्यालाकारवाई करण्याऐवजी एमडी तस्कराच्या सोबतीची बक्षिसी दिली काय, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
एमडी तस्कर आबूच्या नेटवर्कमध्ये पोलिसही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:24 AM
मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे.
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक वास्तव उघड डिफॉल्ट रिपोर्ट वरिष्ठांकडे