राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पोलीस भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध होण्यात `नंबर वन` आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
२०१७ मध्ये ११ प्रकरणांतील १३, २०१८ मध्ये १० प्रकरणांतील ११ तर, २०१९ मध्ये १५ प्रकरणांतील १७ आरोपी पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांना विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही संख्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच, आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तीन वर्षात अनुक्रमे एकूण ३ लाख २६ हजार, ८२ व १ लाख ३० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ही परंपरा यावर्षीही कायम राहिली. जानेवारीपासून आतापर्यंत सर्वाधिक ३ प्रकरणांतील ४ आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कालावधीचा कारावास आणि एकूण १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सदर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे जाहीर करण्यात आली.
खटल्यांना कोरोनाचा ब्रेक
यावर्षी भ्रष्टाचाराच्या खटल्यांना कोरोनामुळे ब्रेक लागला. लॉकडाऊनपासून न्यायालयात केवळ अत्यावश्यक व तातडीची प्रकरणे ऐकली जाऊ लागल्याने भ्रष्टाचाराच्या खटल्यांवरील सुनावणी थांबली. परिणामी, जानेवारीपासून आतापर्यंत केवळ ९ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होऊ शकली. आधीच्या तीन वर्षांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास ही संख्या फार कमी आहे. २०१९ व २०१७ मध्ये प्रत्येकी ५४ तर, २०१८ मध्ये ५६ प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली होती.
- ०६