नागपूर : ग्रामीण भागात बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र अवैध दारू विक्रीला चाप लावण्यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आले आहे. काटोल नजीकच्या डोंगरगाव येथे पारधी बेड्यावर काटोल पोलिसांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३३ हजार रुपये किमतीची मोहाची दारू जप्त केली. पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथे गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पारधी बेड्यावर धाड टाकून पोलिसांनी येथे ११ आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून २५० लीटर मोहाची दारू, २० ड्रम आणि इतर साहित्य असा १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई पथकात सहायक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, उपनिरीक्षक पूनम कोरडे, प्रवीण पवार, प्रवीण सयाम, अस्मिता गायकवाड, सविता आहाके, दुर्गा गाथे, रंजित रोकडे आदींचा समावेश होता.
तान्हा पोळ्याला शहरात मद्यविक्री बंद
तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर शहरात १५ सप्टेंबर रोजी मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.